Friday, August 8, 2025
Homeमहाराष्ट्रकोल्हापुरात महाविकास आघाडीला धक्का; मधुरिमा राजे यांचा उमेदवारी अर्ज मागे

कोल्हापुरात महाविकास आघाडीला धक्का; मधुरिमा राजे यांचा उमेदवारी अर्ज मागे

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी अखेरच्या क्षणी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळं महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात काँग्रेसचे खासदार श्रीमंत शाहू छत्रपती, विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील, माजी आमदार मालोजीराजे यांच्यात उघड नाराजी पाहायला मिळाली. आमदार सतेज पाटील जिल्हाधिकारी कार्यालयातून नाराज होऊन बाहेर पडले, यामुळं कोल्हापूरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपली आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी रद्द झालेले उमेदवार राजेश लाटकर नेमकी काय भूमिका घेतात याकडे अवघ्या जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं. सकाळपासूनच अपक्ष उमेदवार लाटकर नॉट रिचेबल होते. महाविकास आघाडीचे नेते त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, अखेरपर्यंत लाटकर यांच्याशी कोणताही संपर्क झाला नाही. माघार घेण्याची मुदत तीन वाजेपर्यंत असल्यामुळं महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये एकच धाकधूक लागली होती. छत्रपती घराण्याकडून लाटकर यांनी माघार घ्यावी, यासाठी सर्व प्रयत्नशील होते. मात्र उमेदवारी डावलल्यानं नाराज झालेल्या लाटकरांनी कोणाशीही संपर्क न करता आपला उमेदवारी अर्ज माघार घेतला नाही. यामुळं अगदी अखेरच्या क्षणी कोल्हापूरच्या राजघराण्यातील उमेदवार छत्रपती मधुरीमाराजे, यांनी काँग्रेसचे खासदार श्रीमंत शाहू छत्रपती, मालोजीराजे छत्रपती यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन आपला उमेदवारी अर्ज माघार घेतला. त्यांच्या या निर्णयामुळं महाविकास आघाडीला कोल्हापुरात मोठा धक्का बसला आहे.

महाविकास आघाडीचे कोल्हापुरातील नेते सतेज पाटील अपक्ष आणि बंडखोरांना थांबवण्यासाठी प्रयत्नशील होते. मात्र, राजू लाटकर यांच्याशी अखेरच्या क्षणापर्यंत कोणताही संपर्क झाला नसल्यानं प्रचारात असलेल्या सतेज पाटलांनी तडक जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन खासदार शाहू महाराज यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. आता महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांचा मार्ग अधिक सुकर झाला असून महाविकास आघाडी नेमका कोणाला पाठिंबा देते? यावर कोल्हापूर उत्तरचा पुढील आमदार कोण हे ठरणार आहे.

काँग्रेसनं ऐनवेळी मधुरिमा राजे छत्रपती यांना उमेदवारी दिली. मात्र, काही कारणानं त्यांना नाईलाजानं विधानसभा निवडणुकीतून माघार घ्यावी लागत आहे. मात्र काही वेळा अर्ज माघारीही घ्यावे लागतात,” अशी प्रतिक्रिया शाहू छत्रपती यांनी व्यक्त केली.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments