दुसरीकडे हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्यास त्यांना पक्षाकडून उमेदवारी दिली जाऊ शकते. परंतु शरद पवार गटातील निष्ठावान नेते आणि कार्यकर्त्यांचे काय होणार? असा सवाल निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शरद पवारांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बॅनरबाजीच्या माध्यमातून वेगळाच संदेश दिला आहे. नको आजी नको माजी, इंदापूर तालुक्याला हवाय नवीन बाजी, असं म्हणत पवारांच्या कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन पाटलांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला आहे.
भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील तुतारी हातात घेणार का? त्याचा फायदा नक्की कोणाला होईल यावर बोलताना राजकीय विश्लेषक हेमंत देसाई म्हणाले की, हर्षवर्धन पाटील हे सहकार क्षेत्रातील फार मोठं नाव आहे. ते जर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत असतील तर याचा फायदा निश्चितच त्यांच्या पक्षाला होऊ शकतो. मात्र शरद पवार गटातील मतदारसंघातील इच्छुकांची नाराजी दूर करण्यात त्यांना येईल, दत्ता भरणे यांना सध्याची परिस्थिती पाहता हरवणे सोपं असल्याचंही हेमंत देसाई सांगतात. महाराष्ट्रात सध्या शरद पवारांच्या पक्षाला जनसामान्यांचा प्रतिसाद मिळत आहे. तसेच लोकसभेतदेखील स्ट्राइक रेटचा विचार केला तर सर्वात जास्त स्ट्राइक रेट हा त्यांच्या पक्षाचा राहिला आहे. अजित पवारांच्या उमेदवाराचा पराभव करण्यासाठी हर्षवर्धन पाटील यांची शक्ती आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद एकत्र मिळून दत्ता भरणे यांचा पराभव करणे सोपं जाऊ शकते. त्यामुळे हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी दिल्यास जिंकणे सोपं जाईल, असंही हेमंत देसाई यांनी सांगितलं आहे.
हर्षवर्धन पाटील यांचा दत्तामामा भरणे यांनी दोन वेळा पराभव केला आहे. त्यामुळे त्यांनी कोणत्याही पक्षात प्रवेश केल्याने आम्हाला फरक पडणार नाही. यावेळीदेखील दत्ता भरणे त्यांना पराभूत करतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते संजय तटकरे यांनी म्हटले आहे.
राजकीय कारकिर्दीच्या पदार्पणात हर्षवर्धन पाटील यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. इंदापूर मतदारसंघात हर्षवर्धन पाटील 1995, 1999 आणि 2004 असे सलग तीन वर्षे निवडून आले. त्यानंतर 2009 साली हर्षवर्धन पाटलांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि ते आमदार झाले. 2014 साली राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस वेगवेगळे निवडणुकीला सामोरे गेले आणि त्यावेळेस त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दत्ता भरणे यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर त्यांनी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला आणि दुसऱ्यादा वेळीसुद्धा दत्ता भरणे यांनी 2019 साली त्यांचा पराभव केला होता. हर्षवर्धन पाटलांनी अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे जावे, अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती. परंतु आता शरद पवारांच्या पक्षाची महाराष्ट्रात क्रेज वाढल्यामुळे तुतारी हातात घ्यावी, असा अनेक कार्यकर्त्यांच्या भावना पोस्टर्सच्या माध्यमातून व्यक्त करण्यात येत आहे. भाजपा नेते हर्षवर्धन पाटील आणि त्यांची मुलगी अंकिता पाटील यांनी सिल्व्हर ओक येथे जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. तर दुसऱ्या बाजूला चिरंजीव राजवर्धन पाटील यांनी आपल्या व्हॉट्सअप स्टेटसला तुतारी आणि शरद पवार यांचा फोटो ठेवल्याचं पाहायला मिळत आहे, त्यामुळे एकंदरीत हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात प्रवेश करण्याची राजकीय वर्तुळात चर्चा जोरात सुरू आहे.