4 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे मोठ्या उत्साहात नौदल दिन साजरा करण्यात आला होता. तेव्हा मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं. परंतु, हा पुतळा सोमवारी (26 ऑगस्ट) दुपारी कोसळला. त्यामुळं शिवप्रेमी संतप्त झाल्याचं पाहायला मिळतंय. तसंच या घटनेवर सर्वच स्तरातून टीका होत आहे. विशेष म्हणजे 21 व्या शतकात अनेक प्रकारचे तंत्रज्ञान उपलब्ध असताना उभारलेला शिवरायांचा पुतळा कोसळणं ही खरंच दु:खद बाब असल्याचं मत व्यक्त केलं जातंय.
छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा ज्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आला, तो किल्ला शिवाजी महाराजांनी तब्बल 360 वर्षांपूर्वी बांधला होता. परंतु तो आजही मजबूत आहे. पण, काही महिन्यांपूर्वी उभारलेला शिवरायांचा पुतळा मात्र एक वर्षही पूर्ण न होता कोसळलाय. त्याच पार्श्वभूमीवर मराठा नौदलाचा मानबिंदू असणाऱ्या राजकोट किल्ल्याविषयी आणि त्याच्या उभारणीत वापरल्या गेल्या तंत्रज्ञानाविषयीची माहिती जाणून घेणं नक्कीच समयोचित ठरणारं आहे.
राजकोट किल्ला हा मुख्यतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या शस्त्रास्त्रासाठी ओळखला जाणारा किल्ला आहे. हिरोजी इंदुलकर यांनी राजकोट किल्ल्याच्या पायाभरणीसाठी 70000 किलोपेक्षा जास्त लोखंड आणि शिसे वापरले. त्यामुळं 360 वर्षांनंतरही हा किल्ला आजही दिमाखात उभा आहे. मात्र, राजकोट किल्ल्यावर आठ महिने 22 दिवसांपूर्वी उभारलेला महाराजांचा 35 फुटी पुतळा कोसळलाय.
शिवाजी महाराज यांचे किल्ले त्यांच्या काळातील सामरिक तटबंदी आणि वास्तुशास्त्रीय चमत्कार आहेत. त्यांच्या निर्मितीमध्ये वापरलेले बांधकाम तंत्र मराठ्यांच्या अभियांत्रिकी पराक्रमाचं प्रदर्शन करते. किल्ल्यामध्ये दगड आणि चुना यांसारख्या स्थानिक सामग्रीचा वापर करण्यात आलाय. ज्यामुळं त्यांचा टिकाऊपणा आणि दीर्घायुष्य सुनिश्चित झालं.
छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक महान योद्धा नव्हते तर एक वास्तुविशारद देखील होते. प्रसिद्ध रायगड किल्ल्यासह अनेक किल्ल्यांचं बांधकाम आणि तटबंदीची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यांच्या स्थापत्यशास्त्रातील योगदानानं त्यांच्या राज्याच्या संरक्षणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले हे केवळ स्थापत्यशास्त्र नसून सर्वांना प्रेरणा देणारा आणि प्रचंड अभिमान देणारा ऐतिहासिक वारसा आहे.
परकीय वसाहती करणाऱ्यांच्या म्हणजेच इंग्रज, डच, फ्रेंच आणि पोर्तुगीज व्यापाऱ्यांच्या वाढत्या प्रभावाचा मुकाबला करणे आणि जंजिऱ्याच्या सिद्दींचा उदय रोखणे हा राजकोट किल्ला उभारण्यामागचा मुख्य उद्देश होता. 1664 मध्ये हिरोजी इंदुलकर यांनी बांधकामाची देखरेख केली. शिवरायांनी हा किल्ला उभारण्यासाठी 200 वडेरा लोकांना आणले. 25 नोव्हेंबर 1664 रोजी किल्ल्याचं बांधकाम सुरू झालं आणि 1667 पर्यंत तीन वर्षांच्या कालावधीत हा किल्ला बांधला गेला.