Friday, August 8, 2025
Homeदेशहिंडेनबर्ग रिसर्च'च्या ट्विटनंतर भारतात खळबळ

हिंडेनबर्ग रिसर्च’च्या ट्विटनंतर भारतात खळबळ

भारतातील आघाडीच्या व्यावसायिक समूहांपैकी एक असलेल्या अदानी समूहाविरुद्ध खळबळजनक अहवाल प्रसिद्ध करणारी हिंडेनबर्ग ही कंपनी पुन्हा चर्चेत आली आहे. अमेरिकन शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्ग रिसर्चनं भारतासंदर्भात एक नवीन खुलासा जाहीर करणार असल्याचं म्हटलं आहे.

हिंडेनबर्ग रिसर्चच्या एक्स अकाउंटवरील पोस्टमध्ये म्हटलंय, “भारतात लवकरच मोठा खुलासा करणार आहे. जानेवारी 2023 मध्ये, हिंडेनबर्गनं अदानी समूहावर आर्थिक अनियमिततेचा आरोप करणारा अहवाल प्रकाशित केला होता. ज्यामुळं अदानी समूहाच्या शेअरच्या किमतीत लक्षणीय घट झाली होती. त्यावेळी समुहानं मात्र, हिंडेनबर्गचा दावा फेटाळून लावला होता.

अदानी समूहानं स्टॉकमध्ये फेरफार तसंच फसवणूक केल्याचा दावा हिंडेनबर्गनं प्रसिद्ध केलेल्या अहवालात करण्यात आला होता. अहवाल प्रकाशित झाल्यानंतर अदानी समूहाच्या विविध कंपन्यांच्या समभागांमध्ये मोठी घसरण झाली होती. ज्याची किंमत सुमारे 100 अब्ज डॉलरपेक्षा जास्त आहे.

यावर भारतातील प्रसिद्ध ज्येष्ठ वकील तथा भाजपा नेते राम जेठमलानी यांनी जुलैमध्ये हिंडेनबर्ग रिसर्च संस्थेवर गंभीर आरोप केला होता. “चीनशी संबंध असलेल्या एका यूएस-आधारित व्यावसायिकानं हिंडेनबर्ग रिसर्चचा अहवाल तयार केलाय. ज्यामुळं जानेवारी 2023 मध्ये अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये लक्षणीय घट” झाल्याचं त्यांनी म्हटलं होतं. तसंच किंग्डन कॅपिटल मॅनेजमेंट, एलएलसीचे अमेरिकन उद्योगपती मार्क किंग्डन यांनी अदानी समूहाचा अहवाल तयार करण्यासाठी हिंडेनबर्ग रिसर्चला नियुक्त केल्याचा दावा जेठमलानी यांनी केला होता.

जेठमलानी यांनी यावर्षी जुलैमध्ये “X” वर आरोप केला की, गुप्तहेर ॲन्ला चेंगसह त्यांचे पती मार्क किंग्डन यांनी अदानी समूहाच्या कंपन्यांवर अहवाल तयार करण्यासाठी हिंडेनबर्ग रिसर्चची नियुक्ती केलीय. त्यांनी कोटक महिंद्रा इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड (KMIL) चा वापर अदानी शेअर्सच्या शॉर्ट-सेलिंगसाठी केला. त्यामुळं त्यांना लाखोंचा नफा मिळाला. त्यानंतर त्यांनी अदानी समूहाला टार्गेट करणाऱ्या राजकीय नेत्यांची चीनशी असलेल्या संबंधांबाबत चौकशी करण्याची मागणीही सरकारकडं केली होती. अमेरिकन शॉर्ट सेलर हिंडेनबर्गच्या अहवालामागं चिनीचा हात असल्याचा दावा त्यावेळी करण्यात आला होता. हैफा बंदरासारख्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना गमावल्याबद्दल चीनीनं अदानी समुहाला लक्ष्य केल्याचं त्यांचं म्हणणं होतं.

याआधी भारताच्या सर्वोच्च न्यायालयानंही अदानी समूहाला हिंडेनबर्ग आरोपांवरून क्लीन चिट दिली आहे. अलीकडेच सर्वोच्च न्यायालयानं अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाच्या चौकशीसाठी न्यायालयाच्या देखरेखीखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याची पुनर्विलोकन याचिका फेटाळून लावली आहे.

या वर्षी जूनमध्ये, अदानी एंटरप्रायझेसच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला (एजीएम) संबोधित करताना, अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी म्हणाले, “आम्हाला एका परदेशी शॉर्ट सेलरनं केलेल्या बिनबुडाच्या आरोपांना सामोरं जावं लागलं. ज्यामुळं आमच्या दशकांच्या मेहनतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments