Friday, August 8, 2025
HomeMain Newsबीड जिल्ह्यातील १८ पैकी १८ सदस्यांनी गुलाल उधळला, राष्ट्रवादीची एकहाती सत्ता

बीड जिल्ह्यातील १८ पैकी १८ सदस्यांनी गुलाल उधळला, राष्ट्रवादीची एकहाती सत्ता

बीड  जिल्ह्यातील सहा कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडली. दरम्यान वडवणी कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल आज हाती असून या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेतकरी विकास महाआघाडीचे १८ पैकी १८ सदस्य निवडून आले आहेत. तर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे राजाभाऊ मुंडे यांच्या शेतकरी विकास पॅनलचा धुव्वा उडालाय. या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडेंना मोठा पराभव स्वीकारावा लागलाय. दुसरीकडे राष्ट्रवादीने वडवणी बाजार समितीवर एकहाती वर्चस्व निर्माण केलंय. विशेष म्हणजे यानिमित्ताने धनंजय मुंडे यांची वाढती ताकद डोळ्यात भरण्यासारखी आहे. कारण इथे प्रकाश सोळंके यांची फारशी ताकद नसताना योग्य वेळी सूत्रे हलवून धनुभाऊंनी विजयी नौका पार केली.

जिल्ह्यातील ८ बाजार समितीमध्ये दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या होत्या. आज परळीची देखील मतदान प्रक्रिया पार पडली असून निकाल हाती येणार आहे. दरम्यान, वडवणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निकालात राष्ट्रवादी काँग्रेसने एकहाती वर्चस्व मिळवलंय. यापूर्वी नगरपंचायत निवडणुकीत देखील पंकजा मुंडे यांना मोठा पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे येथे वर्चस्व पाहायला मिळत आहे.

बीड जिल्ह्यात बाजार समिती निवडणूक सर्वसाधारण मानल्या जायच्या. मात्र यावेळेस अनेक दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या होत्या. यामध्ये सगळ्यात जास्त लक्ष गेवराई वडवणी आणि परळीकडे लागलं होतं. आज वडवणीचा निकाल जाहीर झाला. यात राष्ट्रवादीच्या पॅनलमधील अठरा पैकी अठरा उमेदवारांनी विजयाचा गुलाल उधळला. यामध्ये दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडेंसाठी एक मोठा आणि जिंकण्यासाठी वडवणी सर्कल एक हाती असायचा. मात्र पंकजा मुंडेंच्या हाती आलेल्या सत्तेनंतर या सर्कलमध्ये फक्त एक वेळेस पंकजांना पंचवार्षिक सत्ता भोगण्यास मिळाली.

राजाभाऊ मुंडे हे दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे खंदे समर्थक. त्यांनी कधीही आपली सत्ता इतरांच्या हातात जाऊ दिली नाही. मात्र लोकनेत्यांच्या माघारीनंतर पंकजा मुंडे यांच्या हाती आलेल्या सत्तेने हे समीकरण विस्कळीत झालं. यात सगळ्यात पहिला धक्का नगरपंचायतीमध्ये तर दुसरा सलग धक्का मिळाला बाजार समितीमध्ये… वडवणीत राष्ट्रवादीने पंकजा मुंडेंना सपशेल धोबीपछाड दिलाय. उद्या परळीचा निकाल येणार आहे. त्यामुळे बीडवासियांची उत्सुकता वाढली आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments