सांगली जिल्ह्यातील भिलवडी गावच्या गावकऱ्यांनी प्रबळ इच्छाशक्ती, दृढनिश्चय आणि दृढ संकल्प असेल तर प्रत्येक प्रयत्न यशस्वी होऊ शकतो, हेच सिद्ध केले आहे. रोज सकाळी न चुकता या गावामध्ये राष्ट्रगीत वाजते. भिलवडी हे अशाप्रकारे रोज राष्ट्रगीत वाजवणारे देशातील सहावे गाव आणि महाराष्ट्रातील पहिलेच गाव ठरले आहे. सांगली जिल्ह्यातील भिलवडी या गावातील व्यापारी संघटनेने सुरु केलेली राष्ट्रगीताची परंपरा मागील दोन वर्षांपासून अखंडीतपणे सुरु आहे.
रोज सकाळी दिनविशेष तसेच त्यावर आधारित एक प्रेरणादायी गाणे गावामध्ये वाजवले जाते. तसेच रोज न चुकता बरोबर ९ वाजून दहा मिनिटांनी राष्ट्गीत वाजवले जाते. हे राष्ट्रगीत व्यापारी संघटनेच्या पब्लिक ऍड्रेस सिस्टिमवरून लावले जाते आणि त्याचा सर्व व्यापारी आणि ग्रामस्थ मान राखतात. धार्मिक स्थळांमध्ये नियमितपणे भजन कीर्तन होणे, ही काही नवीन गोष्ट नसली तरी गावात राष्ट्रगीत नियमितपणे ऐकायला मिळाले, तर गावच देशासारखे भासू लागते, असे गावकरी सांगतात.
दोन वर्षांपूर्वी ही सर्व यंत्रणा सांगली जिल्ह्यातील भिलवडीच्या व्यापाऱ्यांनी बसवली. त्याप्रमाणे रोज सकाळचे नऊ वाजले की सायरन वाजतो. त्यानंतर पब्लिक अॅण्ड्रेस सिस्टीममधून राष्ट्रगीत वाजते. राष्ट्रगीत वाजू लागले की जो तिथे असेल तिथेच थांबून राष्ट्रगीताचा सन्मान करतो. हे सारे नवख्या व्यक्तीसाठी आश्चर्यचकित करण्यासारखेच आहे. मात्र, येथील ग्रामस्थांकसाठी हा एक आपल्या देशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा भाग असल्याचे सांगतात. भिलवडीमध्ये १५ ऑगस्ट २०२० पासून सार्वजनिक उद्घोषणा प्रणालीद्वारे ‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत दररोज वाजवण्यास सुरुवात केली, तेव्हा काहींना वाटले की देशभक्तीचा उत्साह काही दिवसांत किंवा आठवड्यात कमी होईल. पण, सर्व निष्कर्ष खोटे ठरले. दहा हजार लोकसंख्या असलेल्या छोट्या गाववजा शहरातील नागरिकांमध्ये देशभक्तीचा उत्साह जागृत करण्याचे हे काम मागील अडीच वर्षांपासून अविरत सुरु आहे. स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवाला या उद्घषोणेची सुरुवात करुन दोन वर्ष पूर्ण झाले.
या गावातील काही व्यापाऱ्यांनी सतत प्रेरणा देण्यासाठी राष्ट्रगीत वाजवण्याची कल्पना सुरु केली. सकाळी ९ वाजता सायरन वाजल्यानंतर, ५२ सेकंदांसाठी राष्ट्रगीत वाजवले जाते, जे गावात सर्वत्र ऐकवले केले जाते. ऑडिओ सुरू होताच, अगदी छोट्या गल्ल्या आणि रस्त्यांवरील नागरिकांचे लक्ष वेधून घेत आपोपाप त्यांना सलाम करायला भाग पाडतात. गावातून जाणारा मार्गही अशाच प्रकारचा साक्षीदार आहे. जेव्हा सकाळी राष्ट्रगीत वाजते तेव्हा वाहतूक थांबते, तेव्हा विविध वाहनांतील नागरिक राष्ट्रगीतासाठी खाली उतरतात.
राष्ट्रगीत गावामध्ये वाजवण्यास सुरुवात झाल्यापासून गावात एकोप्याची भावना अधिक दृढ झाल्याचे गावच्या सरपंच सविता पाटील यांनी सांगितले. तर, हे यशस्वी करण्याचे श्रेय येथील लोकांना जाते, ज्यांनी केवळ पुढाकार घेतला नाही, तर दोन वर्षे देशभक्तीची भावना देखील त्यांनी यशस्वी करून दाखवली.असे बरेच लोक असतील जे वर्षातून फक्त दोनदा राष्ट्रगीताला उभे राहतील. २६ जानेवारी आणि १५ ऑगस्टला. असे अनेक लोक असतील जे वर्षातून एकदाही राष्ट्रगीताला उभे राहणार नाहीत. चित्रपटगृहात चित्रपट पाहताना राष्ट्रगीताला मान देऊन उभे राहणारे काही लोकही असतील. त्यामागे फक्त कायद्याचा धाक असेल. पण महाराष्ट्रातील या छोट्याशा गावाने खूप सकारात्मक संदेश दिल्याचे व्यापारी संघटनेचे सभासद असणाऱ्या दीपक पाटील यांनी सांगितले.