एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर आपणा सर्वांना मी एक आवाहन करत आहे. आम्हाला आपली साथ हवी आहे. गडचिरोलीतील माडियाला आपल्या पाठिंब्याची गरज आहे. अन् इथल्या मूलनिवासी असणार्या आदिवासींना तुम्ही सोबत द्याल याचा मला पूर्ण विश्वास आहे.
मी ज्या समाजातून आलो त्या माडिया या अतिअसुरक्षित आदिवासी समाजाने माझ्या आसपासचं जंगल आजवर राखून ठेवलं आहे. शेकडो वर्षांपासूनचा हा निसर्गाचा ठेवा हा आमच्यासाठी देवासमान आहे. आम्ही निसर्गाची पूजा करतो अन् आमचं सर्वकाही या निसर्गावरच अवलंबून आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून आमचा निसर्ग आमच्यापासून उचलून, मोडून, तोडून जेसीबी, क्रेन वगैरे मशिनांच्या साहाय्याने चोरून घेऊन जाण्याचे कारस्थान काहींनी रचले आहे. आम्ही भारताचे संविधान मानणारे लोक आहोत. या अन्यायाविरोधात लढताना या संविधानातील कायदेही आमच्याच बाजूने आहेत.
पेसा कायदा तसेच वनहक्क कायदा यामुळे शेड्यूल एरियातील (पाचवी अनुसूची) काही हक्क आमच्याकडे आहेत. याद्वारा ग्रामसभांची संमती घेणे शासनासह सर्व खाजगी कंपन्यांना बंधनकारक आहे. आम्ही आमच्या हक्क व अधिकारांसाठी जागरुक होऊन लढत आहोत. मात्र ग्रामसभांना विश्वासात न घेता आमचे दमन सुरू आहे.
सध्या गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड पहाडासह एकूण २५ लोहखाणी प्रस्तावित आहेत. यातील सुरजागड येथे लॉइड अँड मेटल्स कंपनी, त्रिवेणी अर्थमुव्हर्स कंपनी बेकायदा आमच्या जंगलातील झाडे तोडून, डोंगर पोखरुन लोह घेऊन चालले आहेत. आम्ही यावर जिल्हा प्रशासन, राज्यपाल, सदर खात्याचे मंत्री अशा सर्वांना निवेदने दिली. मात्र आम्हाला न्याय मिळत नाहीये. त्यामुळे २५ ऑक्टोबर २१ रोजी हजारोंच्या संख्येने मोर्चा काढत आम्ही जिल्हा प्रशासनाला निवेदन देत एटापल्ली येथे ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
पर्यावरणाचा जगभर र्हास सुरू असताना त्याचे दुष्परिणाम आपण पाहतच आहोत. ज्या आदिवासींनी आजवर जंगल जपून ठेवत निसर्गाला जिवंत ठेवण्याचं काम केलं आज त्या आदिवासीकडून त्याचं जंगल हिसकावून घेण्याचा प्रकार सुरू आहे. एकवेळ तोडलेली झाडे लावता येतीलही पण चोरीला गेलेला डोंगर कसा बांधणार? तेव्हा मी आमच्या गडचिरोली जिल्ह्याच्या सर्व जनतेचा, माडिया आदिवासींचा प्रतिनिधी म्हणून आपल्याला आवाहन करतो की आपण आमच्या खदानी विरोधातील बेमुदत ठिय्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवावा. ज्या निसर्गाचा आपण भाग आहोत त्या निसर्गाच्या बाजूने उभे राहून शास्वत विकासाची मागणी करत खदानीला विरोध करावा.



