राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे. सरकार कधीही कोसळू शकते या चर्चेप्रमाणेच उरलेली अडीच वर्षे राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार अशीदेखील चर्चा रंगते. उपमुख्यमंत्री अजित पवार आगामी काळात मुख्यमंत्री होतील असा अंदाज नेहमी बांधला जातो. मात्र या मुद्द्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रोखठोक भाष्य केलं आहे. त्यांनी महाविकास आघाडीचे नेतृत्व पूर्ण पाच वर्षे शिवसेनेकडेच राहील असं आज स्पष्टपणे सांगितले. त्यांनी मुख्यमंत्रिपदाबाबतच्या चर्चेचा सोक्षमोक्ष लावला आहे.
शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आगामी काळात अजित पवार मुख्यमंत्री होणार आहेत. त्याच भीतीमुळे भाजप त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे का ? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला त्यांनी थेट उत्तर दिलं. राष्ट्रवादी, शिवसेना आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी एकत्र बसून हे सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला. यावेळी या सरकारचं नेतृत्व शिवसेनेकडे असेल ही गोष्ट सर्वांनी एकमताने मान्य केलेली आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाच्या ठिकाणी दुसरा कोणी व्यक्ती येण्याचा प्रश्न नाही, असं शरद पवार यांनी सांगितलं.
तसेच पुढे बोलताना त्यांनी लखीमपूर खेरी हिंसाचार तसेच शेतकरी मृत्यूवर बोलताना केंद्र सरकारला लक्ष्य केलं. मी दिल्लीत होतो. तिथे मी काही लोकांशी भेटलो. सत्तेची गुर्मी काही लोकांच्या डोक्यात भरपूर आहे. ज्यांनी गाडी चालवली त्याचे वडील केंद्र सरकारमध्ये राज्यमंत्री आहेत. त्यामुळे साहजिकच आहे की गंभीर गोष्ट घडल्यानंतर तसेच हत्तेचा आरोप झाल्यानंतर राजीनामा द्यायला हवा होता. पण सत्तेचा दर्प एवढा आहे. आम्ही काही वाट्टेल ते करू आम्ही सत्ता सोडणार नाही, हा उन्माद दाखवण्याचा प्रयत्न होत आहे. पण जनता त्याला वेळोवेळी उत्तर देईल, असा घणाघात शरद पवार यांनी केला.