Saturday, August 9, 2025
HomeMain Newsज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे कोरोनामुळे निधन

ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे कोरोनामुळे निधन

कोरोनामुळे ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे निधन झाले आहे. त्यांना काही दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाली होती. यानंतर तातडीने त्यांना ठाण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण आज दुपारी त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

खारेपाटण तालुक्यातील शेजवली हे किशोर नांदलस्कर यांचे मूळ गाव. त्यांचा जन्म मुंबईतच झाला होता. मुंबईत लॅमिंग्टन रस्ता, नागपाडा, घाटकोपर आणि अन्य काही भागात त्यांचे लहानपण गेले. ‘न्यू इरा हायस्कूल’ आणि ‘युनियन हायस्कूल’ येथे त्यांचं शालेय शिक्षण झाले. वडील खंडेराव यांच्याकडून किशोर नांदलस्कर यांना अभिनयाचा वारसा मिळाला होता. त्या काळात त्यांनी नाटकांमधून स्त्री भूमिका केल्या होत्या.

त्यांनी केशवराव दाते यांच्या नाटक कंपनीत तसेच अन्य काही नाटकांमधून काम केले होते. सुमारे 40 नाटके, 25 हून अधिक मराठी व हिंदी चित्रपट आणि 20 हून अधिक मालिकांमध्ये नांदलस्कर यांनी काम केले आहे. ‘नाना करते प्यार’ हे त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर काम केलेले शेवटचे नाटक होते.

‘सारे सज्जन’, ‘शेजारी शेजारी’, ‘हळद रुसली कुंकू हसले’ आणि इतर काही चित्रपट त्यांच्या नावावर जमा आहेत. त्यांचे ‘विच्छा माझी पुरी करा’ हे नाटक नव्याने पुन्हा रंगभूमीवर सादर झाले. या नाटकातील ‘राजा’ची भूमिका तसेच दिलीप प्रभावळकर यांनी लोकप्रिय केलेले ‘वासूची सासू’ हे नाटकही नव्याने रंगभूमीवर सादर झाले. यात प्रभावळकर यांची भूमिका नांदलस्कर यांना साकारायची संधी मिळाली. व्यावसायिक रंगभूमीवर नांदलस्कर यांनी ‘चल आटप लवकर’, ‘भ्रमाचा भोपळा’, ‘पाहुणा’, ‘श्रीमान श्रीमती’, ‘भोळे डॅम्बीस’, ‘वन रूम किचन’ आदी नाटकांमधून प्रेक्षकांना पोट धरून हसवले.

नांदलस्कर यांचा महेश मांजरेकर यांच्या ‘वास्तव’ चित्रपटातून बॉलीवूडच्या रुपेरी पडद्यावर प्रवेश झाला. ‘जिस देश में गंगा रहता है’ (गोविंदा), ‘तेरा मेरा साथ है’ (अजय देवगण), ‘खाकी’ (अमिताभ बच्चन) यांच्याबरोबर काम करायची संधी त्यांना मिळाली. ‘चाल जाए पर वचन न जाए’, ‘ये तेरा घर ये मेरा घर’, ‘हलचल’, ‘सिंघम’ या हिंदी चित्रपटांतही त्यांनी भूमिका साकारली होती.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments