Friday, August 8, 2025
HomeMain Newsबहुमत असतानाही भाजपनं इंदापूरच्या ग्रामपंचायतीची सत्ता गमावली! कारण काय?

बहुमत असतानाही भाजपनं इंदापूरच्या ग्रामपंचायतीची सत्ता गमावली! कारण काय?

इंदापूर तालुक्याच्या कळंब गावात बहुमत असलेल्या भाजपच्या एका सदस्याच्या चुकीमुळे पाच वर्षांची हाती आलेली सत्ता भाजपला गमवावी लागली आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात कमालीची नाराजी पसरली आहे. याउलट निकालावेळी निराश झालेल्या राष्ट्रवादीला ऐतिहासिक लॉटरी लागल्याने त्यांच्या गोटात कमालीचा आनंद दिसत आहे. इंदापूर तालुक्याच्या ग्रामपंचायतीच्या इतिहासात सरपंच पदाच्या निवडणुकीत कदाचित अशी घटना झालेली नसावी

राजकारणातील एक चूक किती महागात पडते याचा प्रत्यय इंदापूर तालुक्यातील भाजप पक्षाला आला आहे. त्याचं झालं असं, कळंब गावची ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची झाली होती. यामध्ये भाजप पुरस्कृत पॅनलला नऊ जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलला आठ जागा मिळाल्या होत्या. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी सरपंचपदाचा दावा केला होता.

त्यानंतर भाजपच्या अनिता नंदकुमार सोनवणे यांनी आज (9 फेब्रुवारी) कळंब गावाच्या सरपंचपदासाठी अर्ज भरला. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्या अतुल सावंत यांनी अर्ज दाखल केला. या निवडणुकीत 17 जणांनी मतदान केले. मात्र एका मतदाराने दोन्हीही उमेदवाराच्या समोर खुणा केल्यामुळे त्याचे मतदान बाद झालं.

दोन्ही उमेदवारांना समसमान मते पडल्यानंतर कळंब ग्रामपंचायतीच्या समोरील लहान मुलगा रुद्र दिपक चव्हाण याला बोलावून दोन उमेदवारांपैकी एका उमेदवाराची चिठ्ठी काढण्यास निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सांगितले. त्याने विद्या अतुल सावंत यांच्या नावाची चिठ्ठी काढल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आलं.

त्यानंतर उपसरपंचपदी निवडणुकीत भाजपाच्या लक्ष्मण पालवे यांना 17 पैकी 9 तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेंद्र कल्याण डोंबाळे यांना 8 मते पडली. त्यामुळे कळंब ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्या अतुल सावंत यांची तर उपसरपंचपदी भाजपच्या लक्ष्मण पालवे यांची निवड झाली, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सूर्यकांत पुजारी यांनी दिली.

सरपंच पदाच्या निवडणुकीत काढलेल्या लकी ड्रॉ मध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराची चिट्ठी निघाल्याने या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची लॉटरी राष्ट्रवादीला लागली. तर बहुमतातील भाजपला केवळ उपसरपंच पदावर समाधान मानावे लागले

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments