Friday, August 8, 2025
Homeमहाराष्ट्र31 जानेवारीपासून बाबासाहेबांच्या ‘मूकनायक’ पाक्षिकाचे शताब्दी वर्षः परिवर्तनवादी चळवळीतील सर्व घटक साजरे...

31 जानेवारीपासून बाबासाहेबांच्या ‘मूकनायक’ पाक्षिकाचे शताब्दी वर्षः परिवर्तनवादी चळवळीतील सर्व घटक साजरे करतील का

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, कोणतीही चळवळ यशस्वी करण्यासाठी त्या चळवळीचे वर्तमानपत्र असावे लागते. ज्या चळवळीचे वर्तमानपत्र नसते, तिची अवस्था पंख तुटलेल्या पक्षाप्रमाणे होते. त्यामुळेच त्यांनी सामाजिक समतेच्या लढयासाठी ३१ जानेवारी १९२० रोजी मूकनायक हे पाक्षिक सुरू केले. मूकनायक हे समाजाच्या वेदना व विद्रोह प्रकट करण्यासाठी सुरू केलेले मराठी भाषेतील पाक्षिक होते. या पाक्षिकाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी दलित, गरीब व शोषित जनतेच्या व्यथा मांडल्या आणि या समाजाच्या उन्नतीसाठी तत्कालिन ब्रिटिश सरकारला काही उपाययोजना सूचवल्या. यानंतर त्यांनी बहिष्कृत भारत, जनता, प्रबुद्ध भारत, समता अशी वृत्तपत्रे सुरू केली.

मूकनायक पाक्षिकापासूनच शोषित, वंचितांच्या पत्रकारितेला सुरूवात झाली. ३१ जानेवारी २०२० पासून मूकनायक पाक्षिकाचे शताब्दी वर्ष सुरू होत आहे. शोषित, वंचितांच्या पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या मूकनायक पाक्षिकाची शताब्दी महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी मोठ्या हर्षोल्हासात साजरी व्हावी, अशी अपेक्षा आहे.  सर्व आंबेडकरी चळवळीच्या वतीने ३१ जानेवारी रोजी बाबासाहेबांची पत्रकारिता यावर चिंतन व्हावे यासाठी कार्यक्रमाचे आयोजन होणे गरजेचे आहे. सध्याच्या पत्रकारितेचा स्तर पाहता शोषित, वंचितांसाठी झटणारी पत्रकारिता आवश्यक असल्याचे जाणवू लागले आहे. बीड येथे बहुजन पत्रकार संघाच्या वतीने २०१३ पासून दरवर्षी ३१ जानेवारी रोजी मूकनायकदिन साजरा करण्यात येतो. पर्यायी संस्कृती निर्माण करण्याच्या दृष्टीने हा महत्वपूर्ण उपक्रम आहे. अशाच पद्धतीचा उपक्रम इतर शहरातही सुरू झाला आहे. औरंगाबाद हे आंबेडकरी चळवळीचे केंद्र आहे. त्यामुळे या ठिकाणीही उपक्रमाची सुरूवात होणे आवश्यक वाटत आहे. शासकीय पातळीवरही हा उपक्रम साजरा केला गेला तर अधिक उत्तम! परिवर्तनवादी चळवळीतील सर्व घटकांनी एकत्रितपणे मूकनायकचे शताब्दी वर्ष साजरे करण्याच्या दृष्टिने विचार करावा, यासाठीच हा प्रपंच!

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments