Friday, August 8, 2025
HomeMain News४ ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा या नियमावलीनुसार होतील सुरु, शिक्षणमंत्र्यांनी दिली सविस्तर माहिती!

४ ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा या नियमावलीनुसार होतील सुरु, शिक्षणमंत्र्यांनी दिली सविस्तर माहिती!

राज्य सरकारने ४ ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे राज्यभर मुलांना पुन्हा शाळेत जायला कधी मिळणार? यावर सुरू असलेल्या चर्चेवर पडदा पडला आहे. यासंदर्भातील घोषणा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. पण, त्यासोबत आता शाळांमध्ये मुले जाताना नेमके कोणते नियम असतील? हे महत्त्वाचे ठरणार आहे.

आज दुपारी वर्षा गायकवाड यांनी त्यासंदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितल्यानुसार, ४ ऑक्टोबरपासून राज्यातील ग्रामीण भागात ५वी ते १२वी चे वर्ग सुरू होणार आहेत. त्यासोबतच, शहरी भागात ८वी ते १२वीचे वर्ग सुरू होतील. यासाठी टास्क फोर्स आणि राज्य सरकारने मिळून बनवलेली नियमावली सर्व शाळा, पालक आणि विद्यार्थ्यांना बंधनकारक असणार आहे.

आपण ७ जुलै २०२१ रोजी जीआर काढला होता की जे ग्रामीण भाग कोरोनामुक्त झाले आहेत, तिथे ८ वी ते १२वीच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. १५ जुलैपासून त्या शाळांना परवानगी दिली होती. त्यानुसार शाळा सुरू झाल्या होत्या. त्यानुसार एसओपीही दिल्या होत्या. नंतर ग्रामीण भागात ५वी ते ८वी आणि शहरी भागात ८वी ते १२वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.

१० ऑगस्ट रोजी त्याच्या एसओपी देखील जाहीर केल्या होत्या. त्यानंतर यावर मंत्रिमंडळात चर्चा झाली. शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर आमच्या एसओपींमध्ये अजून काही सूचना दिल्या, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या. हा निर्णय निवासी शाळांना लागू असणार नसून, नियमित भरणाऱ्या शाळांसाठीच हा निर्णय लागू असेल, अशी माहिती देखील वर्षा गायकवाड यांनी दिली.

दरम्यान, शाळांसाठी, पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी असलेल्या काही नियमांचा उल्लेख यावेळी वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत केला. शिक्षकांचे लसीकरण, शाळांमध्ये हेल्थ ट्रेनिंग, शाळेत येताना घ्यायची काळजी, खेळाबद्दलचे नियम, आजारी विद्यार्थ्यांना शोधायचे कसे, याविषयीचे नियम ठरवण्यात आल्याचे त्या म्हणाल्या.

विद्यार्थ्यांबद्दल शिक्षकांना अवगत करून देणे आणि त्यांच्याशी कसे वागावे हे शिक्षकांना सांगावे. शिक्षक आणि पालक यांच्या बैठकीत काय चर्चा व्हायला हवी. तसेच, घरात शिरताना मुलांनी काय काळजी घ्यायला हवी, गणवेश धुवायला टाकणे, लागलीच आंघोळ करणे, अशा बाबींचा नियमावलीत समावेश करण्यात आल्याचे वर्षा गायकवाड म्हणाल्या.

त्याचबरोबर पालकांची विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी संमती असणे, विद्यार्थ्यांच्या हजेरीसाठी शाळेने सक्ती न करणे, विद्यार्थ्यांमध्ये शारिरीक अंतर ठेवणे, शक्य असेल तिथे एक दिवसाआड शाळा ठेवणे, या बाबी देखील नियमावलीत असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.

शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे लसीचे दोन डोस व्हायला हवेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची सर्व काळजी घेतली जावी, असे देखील नियमावलीत नमूद केल्याचे त्या म्हणाल्या.

विद्यार्थी कोरोनाबाधित आढळला, तर अशा मुलांसाठी आयसोलेशन सेंटर करावे. स्थानिक डॉक्टरांचे क्रमांक उपलब्ध करून द्यावेत. शाळांनी अशा विद्यार्थ्यांसाठी आवश्यक ती आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्यावी. विद्यार्थ्यांचे तापमान वारंवार चेक करत राहावे. ज्या विद्यार्थ्यांचे पालक डॉक्टर आहेत, अशा पालकांनी शाळांमध्ये स्वत:हून सहभागी होऊन या संदर्भात मदतीचा हात पुढे करावा.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments