सातारा तालुक्यातील चाळकेवाडी येथे गॅस्ट्रोने थैमान घातले असून ४० पेक्षा अधिक ग्रामस्थाना गॅस्ट्रोची लागण झाली आहे . त्यामुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली असून आरोग्य विभागाकडून घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी केली जात आहे . ठोसेघर येथील ग्रामस्थ गॅस्ट्रोने बाधित झाले असून त्यांच्यावर ठोसेघर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहेत . तर काहींवर उपचार करून घरी सोडण्यात आले आहे . संपूर्ण गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत ओढ्याचे पाणी मिसळण्याने पाणी दूषित झाले होते . त्यातच ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी पाण्यात क्लोरोफार्म न मिळसळल्याने पाणी दूषित होऊन ही बाधा झाली असल्याचे सांगितले जात आहे . पावसाळयाच्या तोंडावरच एवढ्या मोठ्या प्रमाणावर गावकऱ्यांना गॅस्ट्रोची लागण झाल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे . तसेच ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभाराचा फटकाही ग्रामस्थाना बसला आहे . कामात हलगर्जीपणा करणाऱ्या वर कठोर कारवाईची मागणी ग्रामस्थानकडून करण्यात आली आहे .