हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरण दडपून टाकण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिस आणि प्रशासन करत असलेल्या प्रयत्नांचे एकामागोमाग एक पुरावे पुढे येऊ लागले आहेत. ज्या न्यायवैद्यकशास्त्र प्रयोगशाळेच्या (एफएसएल) रिपोर्टच्या आधारे उत्तर प्रदेश पोलिस पीडितेवर बलात्कार झालाच नसल्याचे सांगत आहेत, त्या अहवालासाठी तब्बल ११ दिवस जुने सॅम्पल्स वापरण्यात आले आहेत. एवढ्या जुन्या सॅम्पल्सना वैद्यकशास्त्रात कोणतीही किंमत नाही, असा खुलासा अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अझीम मलिक यांनी म्हटले आहे. सरकारी मार्गदर्शक तत्वांनुसार घटना घडल्यानंतर ९६ तासांतच फॉरेन्सिक पुरावे आढळू शकतात. त्यामुळे ११ जुने सॅम्पल वापरून तयार करण्यात आलेल्या या रिपोर्टच्या आधारे बलात्कार झाल्याचे सिद्ध होऊच शकत नाही, असे डॉ. मलिक यांनी म्हटले आहे. येथेच पीडितेवर दोन आठवडे उपचार सुरू होते.
पीडितेवर बलात्कार झाल्यानंतर तब्बल ११ दिवासंनी सॅम्पल्स घेण्यात आले. मात्र एखादी घटना घडून गेल्यानंतर ९६ तासांतच फॉरेन्सिक पुरावे आढळू शकतात, असे सरकारच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे. एवढ्या दिवस जुन्या सॅम्पल्सना फॉरेन्सिक पुरावे गोळा करण्याच्या दृष्टीने कोणतीही किंमत उरत नाही, असे डॉ. अझीम मलिक यांनी म्हटले आहे. इंडियन एक्सप्रेसने हे वृत्त दिले आहे.
१४ सप्टेंबर रोजी हाथरसच्या पीडितेला सवर्ण जातीच्या चार लोकांनी मारहाण करून सामूहिक बलात्कार केला. अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात तिच्यावर उचार सुरू होते. उपचारानंतर २२ सप्टेंबर रोजी ती शुद्धीवर आली होती. तेव्हा तिच्यावर बलात्कार झाला की नाही, याचा तपशील मिळवणे शक्य होते. दंडाधिकाऱ्यांसमोर तिचा जबाब नोंदवून घेतल्यानंतर पोलिसांनी एफआयआरमध्ये बलात्कारचे कलम घातले होते.
पीडितेच्या जबाबानंतर न्यायवैद्यक प्रयोगशाळेत सॅम्पल्स पाठवण्यात आले. न्यायवैद्यकशास्त्र प्रयोगशाळेला हे सॅम्पल्स २५ सप्टेंबरला मिळाले. म्हणजेच बलात्काराच्या घटनेनंतर तब्बल ११ दिवासांनी हे सॅम्पल्स प्रयोगशाळेला मिळाले. याच सॅम्पल्सच्या आधारे तयार करण्यात आलेल्या एफएसएल रिपोर्टच्या आधारे उत्तर प्रदेश पोलिस पीडितेवर बलात्कार झालाच नसल्याचा दावा करू लागले आहेत.
हा एफएसएल रिपोर्ट अविश्वासार्ह आहे, असे जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाच्या निवासी डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष डॉ. हामजा मलिक यांनी म्हटले आहे. न्यायवैद्यकशास्त्र प्रयोगशाळेच्या पथकाला ११ दिवसांनंतर बलात्काराचे पुरावे कसे सापडतील? दोन-तीन दिवसांनंतर शुक्राणू टिकत नाहीत. त्यांनी केस, कपडे, नखे आणि योनी-गुदा मार्गातून सॅम्पल्स घेतले. लघवी, शौच आणि पाळीमुळे या सॅम्पल्समध्ये शुक्राणू आढळूनच आलेले नसतील, असे डॉ. हामजा मलिक यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले.