Sunday, February 22, 2026
HomeMain Newsस्वच्छ साताऱ्यासाठी नऊ एमआरएफ सेंटर उभारणी; घनकचरा व्यवस्थापनाचे आदर्श मॉडेल उभारण्याचे आवाहन

स्वच्छ साताऱ्यासाठी नऊ एमआरएफ सेंटर उभारणी; घनकचरा व्यवस्थापनाचे आदर्श मॉडेल उभारण्याचे आवाहन

जिल्ह्यातील घनकचरा व्यवस्थापन अधिक सक्षम आणि शाश्वत करण्याच्या दृष्टीने नऊ ठिकाणी एमआरएफ (Material Recovery Facility) सेंटर उभारण्यात येत असल्याची माहिती याशनी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सातारा यांनी दिली.

जिल्हा परिषद सातारा येथे आयोजित तालुकास्तरीय एमआरएफ व प्लास्टिक व्यवस्थापन प्रकल्पाच्या कार्यान्वयन व संचालन मार्गदर्शन बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, विस्तार अधिकारी, बीआरसी, गटविकास अधिकारी व उपअभियंते उपस्थित होते.

या बैठकीस नेहरू फाउंडेशन फॉर डेव्हलपमेंट अंतर्गत कार्यरत सेंटर फॉर एनवायरमेंट एज्युकेशन (CEE) चे वरिष्ठ कार्यक्रम संचालक प्रभज्योत सोधी, प्रकल्प संचालक विश्वास सिद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, कार्यकारी अभियंता गौरव चक्के, खंडाळाचे गटविकास अधिकारी अनिल वाघमारे, कराडचे गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील तसेच CEE चे जिल्हा समन्वयक आकाश गायकवाड व पाणी व स्वच्छता विभागाचे जिल्हा तज्ञ उपस्थित होते.

उत्कृष्ट बिझनेस मॉडेल विकसित करण्याचा निर्धार

तालुकास्तरीय घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या माध्यमातून कचरा व्यवस्थापनाचे उत्कृष्ट आणि व्यवसायाधारित मॉडेल विकसित करण्यात येणार असल्याचे सीईओ नागराजन यांनी सांगितले. या उपक्रमाच्या पूर्वतयारीसाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने कुटुंब पातळीवर कचरा वर्गीकरणाबाबत व्यापक जनजागृती मोहीम राबवावी, असे निर्देश देण्यात आले.

सातारा जिल्ह्याचे घनकचरा व्यवस्थापनाचे आदर्श मॉडेल उभारण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

ओला-सुका कचरा संकलनाबाबत स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे

प्रभज्योत सोधी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, ओला कचरा दररोज आणि सुका कचरा तीन दिवसांतून एकदा संकलित करावा. ओल्या व सुक्या कचऱ्यासाठी स्वतंत्र वाहने असावीत. दररोज १०० किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण करणाऱ्या आस्थापनांनी स्वतःच्या कचऱ्याचे व्यवस्थापन स्वतः करणे बंधनकारक राहील.

प्लास्टिक कचरा व्यवस्थापनासाठी यांत्रिकीकरण व आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने व्यवसायाधारित मॉडेल उभारण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शिरवळ येथे एमआरएफ सेंटरची उभारणी करण्यात आली असून त्यासाठी आवश्यक मार्गदर्शन CEE संस्थेमार्फत करण्यात आले आहे. उर्वरित प्रकल्पांनाही अशाच पद्धतीने मार्गदर्शन केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

निवड झालेली गावे

तालुकास्तरीय प्लास्टिक केंद्रासाठी मल्हारपेठ, तरडगाव, पाचवड, पुसेगाव, वाठार स्टेशन, मंदृळकोळे, वर्णे, पांगरी व मसूर या ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे. संबंधित गावांचे सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी व तालुकास्तरीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.

सातारा जिल्हा स्वच्छतेच्या बाबतीत अग्रेसर असून सर्वांनी एकत्रित प्रयत्न केल्यास जिल्ह्यात स्वच्छतेचे आदर्श मॉडेल निर्माण होऊ शकते, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments