प्रेम विवाह केल्यामुळे गावकरी असो किंवा घरच्यांचा रोष सहन करावा लागतो. यातून अनेक संतापजनक बातम्या समोर येतं असतात. पण मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील आष्टीमधून धक्कादायक आणि विचित्र बातमी समोर आलीय. सासऱ्याने प्रेम विवाह केल्याची शिक्षा सुनेसह सात पिढ्यांना भोगावी लागतेय. गावातील जातपंचायतने सात पिढ्यांना बहिष्कृत करण्याचे आदेशही दिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघड झालाय. सुनेने पंचायतबद्दल पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर 9 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
सासऱ्याने समाजाची परवानगी न घेता प्रेमविवाह केल्यामुळे त्यांना गावातील पंचायतने अडीच लाख रूपयांचा दंड ठोठावला होता. त्यांनी तो न भरल्याने सुनेसह मुलाला जात पंचायतमध्ये बोलावण्यात आलं. त्यांनीही दंड भरण्यासाठी असमर्थता दर्शविल्याने पंचांनी या कुटुंबाला सात पिढ्या समाजातून बहिष्कृत करण्याचा आदेश दिला. तसंच पाेलीस ठाण्यात तक्रार दिल्यास जीवे मारू अशा, धमक्याही दिली. हा प्रकार 22 सप्टेंबर 2024 ला आष्टी तालुक्यातील डोईठाण येथे घडलाय. हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात झाला. मात्र अखेर 9 जणांविरोधात आष्टी पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनंतर पुन्हा एकदा जात पंचायतचा मुद्दा समोर आल्याने खळबळ उडाली आहेय.
मालन शिवाजी फुलमाळी वय 32 रा.कडा कारखाना ता.आष्टी असं जातपंचायत पीडित सुनेचे नाव असून मालन यांचे सासरे नरसू फुलमाळी यांनी समाजाची परवानगी न घेता प्रेम विवाह केला होता. यांची जात ही नंदीवाले (तीरमाली) अशी आहे. तेव्हा जात पंचायत बसविण्यात आली. यामध्ये नरसू फुलमाळी यांना 2 लााख 50 हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला
मात्र अनेक वर्ष उलटल्यानंतरही त्यांनी हा दंड भरला नाही. त्यामुळे 21 सप्टेंबर 2024 रोजी शिवाजी पालवे रा.धमगरवाडी ता.नेवासा जि.अहमदनगर यांच्या मार्फत जात पंचायतमध्ये मालन यांना बोलावण्यात आले. ही पंचायत आष्टी तालुक्यातील डोईठाण इथे होती. मालन पती शिवाजी, मुलांसह तेथे पोहचल्या. या ठिकाणी पंचांसह समाजाचे 800 ते 900 लोक अगोदरच जमलेले होते. त्यादिवशी ही धक्कादायक शिक्षा सुनावण्यात आली. दरम्यान पोलीस यासंदर्भात अधिक तपास करत आहेत