Monday, August 11, 2025
HomeMain News‘सावित्री-जोती’- टीआरपीचा बळी?

‘सावित्री-जोती’- टीआरपीचा बळी?

महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई यांच्या जीवनावरील बहुचर्चित ‘सावित्री-जोती’ ही मालिका अर्ध्यातून बंद करण्यामागे विशिष्ट विचारसरणी आणि राजकीय दबाव तंत्र तसेच सध्या सुरू असलेल्या टीआरपी अंमलबजावणी पद्धतीचा गैरवापर असल्याची खात्रीलायक माहिती उपलब्ध झाली आहे. प्रेक्षक वर्गाचा कमी प्रतिसाद म्हणजे टीआरपी कमी असल्याचे कारण हे केवळ निमित्त मात्र असल्याची जोरदार चर्चा सध्या समाजमाध्यमातून सुरू आहे.

सोनी मराठी वाहिनीवर ‘सावित्री-जोती’ ही मालिका दाखविण्यात येत होती. पण आता अचानक शनिवार २६ डिसेंबर रोजी या मालिकेचा शेवटचा भाग दाखवून ही मालिका बंद करण्याचा निर्णय वाहिनीने घेतला आहे. या मालिकेला पुरेसा टीआरपी नसल्याने ती बंद करणे क्रमप्राप्त असल्याचे सांगण्यात आले आहे. पण या निर्णयामुळे फुलेप्रेमी बहुजन समाजात तीव्र नाराजी व्यक्त होत असून याबाबतचा असंतोष समाजमाध्यमातून व्यक्त करण्यात येत आहे.

या मालिकेत सावित्रीबाई फुले यांची भूमिका अश्विनी कासार तर जोतिबा फुले ही भूमिका ओंकार गोवर्धन साकारत आहे. मालिका बंद होत असल्याने आपणास धक्का बसल्याची प्रतिक्रिया अश्विनीने व्यक्त करतानाच यापुढे ऐतिहासिक आणि थोर समाजकार्य केलेल्या व्यक्तींची माहिती अशा पद्धतीने जर येणार नसेल तर ते समाज व्यवस्थेला धोकादायक आहे, असेही अश्विनीने सांगितले. या मालिकेच्या संशोधनामधील एक प्रमुख घटक असलेल्या प्रा. हरी नरके यांनीही खेद व्यक्त करताना टीआरपी की अन्य कोणते कारण यामागे आहे हे सुजाण प्रेक्षकांनी शोधावे असे आवाहन केले आहे. ही मालिका बंद होणे दुर्देवी असून आपल्या पूर्वजांच्या त्यागाबद्दलची ही बेफिकिरी आणि बेपर्वा वृत्ती म्हणजे सामाजिक करंटेपणा होय, असे स्पष्ट करून हरी नरके म्हणाले की, सुजाण प्रेक्षकांनी ही मालिका उचलून धरली असताना महिला व बहुजन समाजाचा अपुरा प्रतिसाद असल्याने ही मालिका बंद करावी लागत आहे. ज्यांच्यासाठी या जोडप्याने सर्वस्वाचा त्याग केला त्यांनीच या मालिकेला पुरेसा प्रतिसाद न देणे म्हणजे समाजद्रोह असल्याचे परखड मतही त्यांनी व्यक्त केले. तर विचारवंत आणि लेखक संजय सोनवणी यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना एकंदरीत आपली अभिरुची अत्यंत खालच्या दर्जाची आहे. लफड्यांच्या मालिका धो धो चालतात आणि सावित्री-जोतीला प्रेक्षक नाही म्हणून बंद अशी जळजळीत भाष्य केले आहे.

दरम्यान नरके यांच्या फेसबुक पेजवर आतापर्यंत तीन लाखाहून अधिक नागरिकांनी संबंधित पोस्टला भेट दिली आहे. ही मालिका मध्येच बंद न करता चालू ठेवावी अशा हजारो प्रतिक्रिया यावर व्यक्त झाल्या आहेत.

याबाबत या मालिकेचे निर्माते आणि ‘दशमी’ क्रिएशनचे प्रमुख नितीन वैद्य यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत ‘द वायर’शी बोलताना वैद्य यांनी यामागे जी टीआरपी पद्धत अवलंबली गेली आहे त्याच्या कार्य प्रणालीबाबत शंका व्यक्त केली. कोणाच्या घरात असे यंत्र लावले गेले आहेत आणि त्याचे मूल्यमापन कसे होते याची आपणास माहिती नसल्याचे ते म्हणाले. लॉक डॉउनच्या काळात अनेक मालिकांशी जोडला गेलेला प्रेक्षक तुटला. १३ जुलैनंतर पुन्हा ‘सावित्री-जोती’ ही मालिका सुरू झाली. पण बाकीच्या सर्वच मालिकांप्रमाणे या मालिकेला प्रेक्षक जोडला गेला नसावा, असे माझे मत असल्याचे वैद्य यांनी स्पष्ट केले.
आता ही मालिका बंद होत असली तरी दुसरा नवीन भाग घेऊन आम्ही निश्चितच येऊ, त्या भागात सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांनी केलेल्या कार्यावर जास्त भर असेल असे सांगून वैद्य म्हणाले, याबाबत मंत्री छगन भुजबळ तसेच यशोमती ठाकूर यांनी आपल्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला होता. दुसरा भाग सुरू करण्यास हे मंत्री सकारात्मक असून सध्या या पाहिल्या भागात आम्ही अल्पविराम घेत आहोत. लवकरच ‘सोनी मराठी’वर ‘सावित्री- जोती’चा दुसरा भाग सुरू होईल असा मला आशावाद असल्याचे वैद्य यांनी सांगितले.

‘दशमी क्रिएशन’ने या मालिकेची निर्मिती केली होती. दणकट लेखन, कलाकारांचा उत्तम अभिनय, कसदार सादरीकरण, कसबी दिग्दर्शन आणि सर्वोत्कृष्ट निर्मिती यामुळे ही मालिका अव्वल दर्जाची बनलेली होती पण ही बायोपिक असल्याने त्यात हमखास मनोरंजनाचा मसाला भरता येत नव्हता.

दरम्यान या मालिकेला राजाश्रय देऊन ती बंद करू नका अशी मागणी मंत्री छगन भुजबळ तसेच नितीन राऊत यांनी केली आहे. मालिका समाप्तीचा निर्णय हा एखाद्या मालिकेला मिळणारी प्रेक्षक पसंती ठरवते, कमी प्रतिसादामुळे आम्हाला ही मालिका दाखवणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याचे वाहिनीच्या एका अधिकाऱ्यांने सांगितले.

या पूर्वीही झी मराठी वाहिनीवर असलेली छत्रपती संभाजी राजे यांच्या जीवनावरील मालिका बंद करण्याचा घाट घातला गेला होता. पण नंतर समाजमाध्यमातून उमटलेल्या तीव्र प्रतिक्रियेनंतर ही मालिका पुढे दाखवण्यात आली होती.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments