पंजाबच्या बठिंडामध्ये सैन्य तळावर दि. 12 एप्रिलला झालेल्या गोळीबारात साताऱ्यातील करंदोशी गावातील तेजस मानकर या 22 वर्षाचा जवानाला वीरमरण आले. त्याचे पार्थिव रविवारी गावी करदोशीत आणण्यात आले. पार्थिवाची राष्ट्रीय महामार्गावरील पाचवड येथून फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीमधून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर करंदोशीत त्याच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गावातील ग्रामस्थांनी ठिकठिकाणी तेजस मानकर याला अभिवादन केले.
रविवारी शहीद जवान तेजस मानकरचे पार्थिव करदोशीत आणण्यात आल्यानंतर ‘शहीद जवान तेजस मानकर अमर रहे,’ च्या घोषणा ग्रामस्थांनी दिल्या. पार्थिव घरी आल्यानंतर कुटुंबीयांनी केलेला आक्रोश हृदय पिटाळून टाकणारा होता. त्यानंतर पोलिस विभागाच्यावतीने जवान तेजस मानकरला अखेरची मानवंदना देण्यात आली. त्याचा मोठा भाऊ मेजर ओंकार मानकर याने तेजस च्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.यावेळी पंचक्रोशीतील अलोट जनसमुदाय आणि नेते मंडळी उपस्थितीत होते. वीरमरण आलेल्या तेजस मानकरच्या वडिलांनी बटिंडा येथे झालेल्या घटनेचा तपास करण्याची मागणी केली आहे.