Monday, March 23, 2026
HomeMain Newsसमर खडस निर्भय पत्रकारितेचा आवाज आणि सत्यासाठी लढणारा योद्धा

समर खडस निर्भय पत्रकारितेचा आवाज आणि सत्यासाठी लढणारा योद्धा

आजच्या काळात जेव्हा पत्रकारिता अनेकदा सत्ताधाऱ्यांच्या पायाशी नतमस्तक होताना दिसते, तेव्हा समर खडससारखा पत्रकार समाजासाठी आशेचा किरण ठरतो. पण दुर्दैवाने, आज त्याच्यावर मुद्दाम गैरसमज निर्माण करण्याचा, त्याचं चरित्र हनन करण्याचा आणि त्याच्या सच्च्या आवाजाला दाबण्याचा प्रयत्न सुरु आहे.

गैरसमज पसरवण्यामागचं राजकारण

अलीकडेच सोशल मीडियावर समर खडस यांच्याविषयी अपप्रचार सुरु झाला. काही ठराविक गट आणि आयटी सेल पिलावळीनं त्यांच्यावर ‘तो मुसलमान आहे’ अशी अफवा पसरवली, ज्यातून स्पष्ट दिसतं की हे सर्व हेतुपुरस्सर केलं जात आहे. खरं कारण मात्र वेगळंच आहे — समर खडस सत्ताधाऱ्यांसमोर न झुकणारा, ताठ कण्याचा पत्रकार आहे. त्याने वर्षानुवर्षे गोदी मिडियाच्या खोटेपणाला, बनावट बातम्यांना आणि सत्तेच्या चापलुसीला आरसा दाखवला आहे. त्यामुळेच तो त्यांच्या डोळ्यांत खुपतो आहे.

मत चोरीडॉक्युमेंट्री आणि प्रेस क्लब वाद

महाराष्ट्रात ‘मत चोरी’ या विषयावर आधारित एका डॉक्युमेंट्रीचं स्क्रीनिंग मुंबई प्रेस क्लबमध्ये आयोजित करण्यात आलं होतं. हा कार्यक्रम पत्रकारांनी, समाजकार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी एकत्र येऊन लोकशाहीच्या भवितव्यावर चिंतन करण्यासाठी ठेवला होता. मात्र, काही टीव्ही मिडियावाले अचानक तिथं आले आणि म्हणाले — “हा शो काँग्रेसनं आयोजित केला आहे. आम्हाला निमंत्रण आलं आहे.”

खरंतर त्या कार्यक्रमाचा काँग्रेसशी काहीही संबंध नव्हता. आयोजकांनी नम्रपणे सांगितलं की “ही स्वतंत्र नागरिकांची पुढाकार आहे, कृपया बाहेर जा आणि प्रश्नमंचाच्या वेळेस परत या.” पण टीव्ही मिडियावाल्यांनी याला इगोचा प्रश्न बनवला. त्यांच्या अहंकारामुळे प्रिंट आणि टीव्ही मिडियामध्ये वाद निर्माण झाला. याच घटनेचा व्हिडिओ काहींनी कापाकापी करून चुकीच्या अर्थाने सोशल मीडियावर प्रसारित केला.

हिंदूमुस्लिमफोडणीचा नीच प्रयत्न

ज्यांच्याकडे पत्रकारितेचं भांडवल उरलं नाही, असे बिकाऊ, पायचाटू पत्रकार आता अशा छोट्या घटनांनाही ‘हिंदू-मुस्लिम’ रंग देऊन समाजात तणाव निर्माण करण्याचं काम करत आहेत. समर खडस यांच्याशी झालेला छोटासा वादही या लोकांनी धार्मिक रूप देऊन मोठा मुद्दा बनवला. पण या अफवांमागचं एकच कारण स्पष्ट आहे — सत्य सांगणाऱ्यांना गप्प करण्याचा कट.

समर खडस  सत्यासाठी झटणारा आवाज

समर खडस हा केवळ पत्रकार नाही, तर तो विचारांचा योद्धा आहे. त्याने आपल्या लेखणीतून समाजातील अन्याय, दडपशाही आणि ढोंग यांना नेहमीच आव्हान दिलं आहे. त्याच्या ‘बकऱ्याची बॉडी’ सारख्या कथेने समाजातील असमानता आणि धार्मिक द्वेषावर प्रखर प्रकाश टाकला, तर ‘झुंड’ सारख्या नाटकाने मॉब लिंचिंग आणि झुंडशाहीचा पर्दाफाश केला.

तो माणसातला माणूस शोधणारा पत्रकार आहे — धर्म, जात, पक्ष या सीमांपलीकडे जाऊन सत्य मांडणारा. म्हणूनच त्याचे शत्रू धर्माचे किंवा राजकारणाचे नाहीत, तर असत्याचे आहेत.

सत्तेच्या अहंकाराविरुद्धची भाषा

अनेकांना समर खडसच्या भाषेवर आक्षेप आहे. पण वास्तव हे आहे की, गोदी मिडियाने जेव्हा खोटेपणा आणि चाटुकारितेचा अतिरेक केला आहे, तेव्हा त्यांना उतरवण्यासाठी जी तीव्र भाषा लागते, तीच समर वापरतो. तो बोलतो तेव्हा शब्दांमध्ये आक्रोश असतो — पण तो आक्रोश असतो अन्यायाविरुद्धचा, खोट्याविरुद्धचा.

त्याची भाषा कडवी आहे, पण ती लोकशाहीच्या रक्षणासाठी आवश्यक आहे. कारण आजच्या काळात सौम्य शब्द सत्तेला टोचत नाहीत. आणि समरने ठरवलंय — टोचायचंच.

सामाजिक जाण आणि साहित्यिक विचार

समर खडसचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्याचं साहित्यिक योगदान. तो फक्त बातम्या देत नाही, तर विचारही देतो. समाजाच्या मनोवृत्तीचा, मानसिकतेचा आणि राजकीय व्यवस्थेचा अभ्यास करून तो आपल्या लेखणीतून समाजाला आरसा दाखवतो. त्यामुळे त्याचं लेखन केवळ बातमी नसतं, ते एका युगाचं भाष्य असतं.

समरचा सच्चेपणा आणि जनतेचा विश्वास

समर खडसवर आरोप करणारे काही असतील, पण त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या लाखोंनी आहे. कारण लोक त्याच्यात एक प्रामाणिक, निडर आणि सत्यनिष्ठ व्यक्ती पाहतात. जो स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जनतेसाठी बोलतो, तोच खरा पत्रकार. आणि म्हणूनच आज हजारो तरुण पत्रकार समर खडसला रोल मॉडेल मानतात.

सत्तेच्या विरोधात बोलणाऱ्यांची परंपरा

भारतात अनेक पत्रकार आणि लेखक असे गेलेत ज्यांनी सत्तेच्या विरोधात सत्य मांडलं आणि किंमत चुकवली — गौरी लंकेश, शंकर गुहा नियोगी, प. साईनाथ, रवीश कुमार यांसारखी नावे हीच परंपरा पुढे नेत आहेत. समर खडस त्या परंपरेतला पुढचा आवाज आहे. त्याच्या पाठीशी जनतेचा आधार आहे, आणि म्हणूनच त्याला गप्प करण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरतील.

सत्य आम्हां मनी

समर खडस म्हणतो — सत्य आम्हां मनी, नव्हो गाबाळाचे धनी — हीच ओळ त्याच्या व्यक्तिमत्त्वाचं सार आहे. तो कोणाचं भाडोत्री तोंड नाही, तर जनतेचा आवाज आहे. आज समाजात जेव्हा फेक न्यूज, ट्रोलिंग, आणि आयटी सेलचा माज आहे, तेव्हा समर खडससारख्या पत्रकारांची गरज पूर्वीपेक्षा अधिक आहे.

 वेल डन समर!

जो सत्यासाठी लढतो, त्याला विरोधक मिळतातच. पण सत्याला दबवता येत नाही. समर खडसवर जो अन्याय होत आहे, तो प्रत्यक्षात जनतेच्या आवाजावर होणारा हल्ला आहे. आणि म्हणूनच आपण सर्वांनी एकजुटीनं त्याच्या मागे उभं राहायला हवं.

वेल डन समरजो भी होगा, देखा जायेगा!
कारण जेव्हा समाजात खोटं राज्य करायला लागतं, तेव्हा सत्य सांगणं हेच सर्वात मोठं बंड असतं — आणि समर खडस हे त्या बंडाचं जिवंत प्रतीक आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments