सचिन वाझे यांना पोलीस दलात घेण्याचा निर्णय मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांचाच होता, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी कांग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोप हे गंभीर आहेत, असेही ते म्हणाले.
मुंबई माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी काल थेट राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खळबळजनक आरोप केलेत. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अनेक प्रश्न उपस्थित हाऊ लागले आहे. यामुळे राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे. यासर्व प्रकरणी शरद पवार यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांना उत्तरे दिली.
परमबीर सिंग यांच्या पत्राचे दोन भाग आहेत. एक मोहन डेलकर प्रकरणावर आहे तर दुसरा वाझे प्रकरणावर आहे
डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केली होती. या पत्रात अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले आहेत, असे शरद पवार म्हणाले.
यात गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. गृहमंत्र्यांनी दर महिन्याला 100 कोटी जमा करण्याचे टार्गेट दिल्याचा आरोप या पत्रात आहे, त्यांनी हे पत्र मुख्यमंत्र्यांना आणि मला पाठवलं आहे. यात पैसे गोळा कसे केले जातात आणि ते कुणाकडे दिले जाते यात नमूद करण्यात आलेले नाहीत, देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यावर ते पत्र आला, असाही दावा शरद पवारांनी केला.
हे संपूर्ण प्रकरण गंभीर आणि संवेदनशील बनत आहे. त्यामुळे याची एखाद्या चांगल्या अधिकाऱ्यांकडून चौकशी व्हावी
महाविकासआघाडी सरकार स्थिर आहे. पत्रकार परिषद घेण्यापूर्वी माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा झाली आहे. अनिल देशमुखांबद्दल निर्णय उद्यापर्यंत घेऊ, असेही शरद पवार म्हणाले.
अनिल देशमुख यांचीही बाजू ऐकावी लागेल
अनिल देशमुख यांचीही बाजू ऐकून घ्यावी लागेल. याबाबत सर्वांशी बोलून निर्णय घेऊ, गृहमंत्रीपदाबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील. मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेल्यानंतर परमबीर सिंग हे मला भेटले होते. त्यावेळी त्यांनी अन्याय होत आहे, असे त्यांनी सांगितले होते, असेही पवार म्हणाले.
मी आताच आग्र्याहून आलो आहे. मी या प्रकरणी आतापर्यंत केवळ मुख्यमंत्र्यांशीच बोललो आहे. पक्षातील सहकाऱ्यांशी अजूनही चर्चा केली नाही. राजीनामा घेण्याचा अधिकार केवळ मुख्यमंत्र्यांचा आहे. त्यांनी आमच्याशी चर्चा केली नाही. आम्ही देशमुखांचं म्हणणं ऐकून घेऊ आणि सहकाऱ्यांशीही चर्चा करू, असं पवार यांनी सांगितलं. मात्र, राजीनामा मागणं हे विरोधकांचं कामच आहे, असंही ते म्हणाले.
मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझे यांना दिलं होतं, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी केला. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत पत्र लिहिलं आहे.
परमबीर सिंह यांची बदली करण्यात आल्यानंतर अस्वस्थ असलेल्या सिंह यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांची तक्रार केली आहे. जवळ जवळ आठ पानांचं हे पत्र आहे. त्यात त्यांनी गंभीर स्वरुपाचे आरोप करण्यात आले आहेत. वाझेंना खात्यात घेतल्यानंतर त्यांच्यावर मंत्र्यांनी काय काय टार्गेट दिलं होतं आणि कोणी कोणी वाझेंना काय काय सांगितलं होतं, याची सर्व धक्कादायक माहिती या पत्रात देण्यात आली आहे.