‘अखंड हिंदुस्थान’ असा नारा असणाऱ्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेतील गृह कलह समोर आला आहे. प्रखर हिंदुत्व हाच अजेंडा असणाऱ्या संघटनेत आता फूट पडली आहे. शिवप्रतिष्ठानचे कार्यवाहक नितीन चौगुले यांच्या निलंबनानंतर संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठानमध्ये उभी फूट पडल्याचे आता स्पष्ट झाले आहे
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ही कट्टर हिंदुत्ववादी संघटना म्हणून देशभर ओळखली जाते. संभाजी भिडे यांची संघटना म्हणून या संघटनेची खरी ओळख आहे. भिडे गुरुजींच्या आदेशावर चालणाऱ्या या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचा गल्लीपासून दिल्लीपर्यंत दबदबा आहेत. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत शिवप्रतिष्ठानची भरभक्कम, अशी ओळख आहे.
शिवप्रतिष्ठानकडून नवरात्रमध्ये निघणारी दुर्गामाता दौड जवळपास अनेक राज्यात कट्टर हिंदुत्ववादी संघटना राबवतात. अशा धर्म-देश ध्येयवेड्या असणाऱ्या संघटनेत आता फूट पडली आहे संभाजी भिडे गुरुजी यांच्यासोबत गेल्या वीस वर्षांपासून नितीन चौगुले धारकरी म्हणून काम करत आहेत. त्यामुळेच संघटनेची कार्यवाहक ही जबाबदारी नितीन चौगुले यांच्यावर सोपवण्यात आली होती. कट्टर हिंदुत्ववादी आणि भिडे गुरुजींचे कट्टर समर्थक म्हणून नितीन चौगुले यांना ओळखले जाते.
भिडे गुरुजी यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने नितीन चौगुले यांच्या नेतृत्वाखाली शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी सांगलीत सध्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या सभेत हल्लाबोल केला होता. त्यामुळे नितीन चौगुले यांचा शिवप्रतिष्ठानमध्ये एक वेगळा दबदबा निर्माण झाला होता. मात्र याच नितीन चौगुले यांना आता संघटनेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
कोणतीही कल्पना न देता, आपलं निलंबन करण्यात आले, यावर चौगुले यांनी आश्चर्य व्यक्त करत शिवप्रतिष्ठानमधील काही मंडळींकडून जाणीवपूर्वक केलेल्या तक्रारीमुळे हा प्रकार घडल्याचे स्पष्ट केलं. त्यांनी संघटनेत शर्जील उस्मानीचे चाहते निर्माण झाल्याचा थेट आरोप केला आहे. त्याचबरोबर याबाबत लवकरच पुढील भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र, या घटनेतून शिवप्रतिष्ठानमध्ये अंतर्गत कलह सुरु असल्याचं समोर आले आहे.
नितीन चौगुले यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर त्यांच्या शेकडो समर्थकांनी राष्ट्रीय अध्यक्षांच्या समोर जाऊन ठाण मांडत निलंबनामागील कारण विचारलं. जे कार्यकर्ते आतापर्यंत संभाजी भिडे गुरुजी यांचा आदेश प्रमाण मानत होते. आज तेच त्यांच्यासमोर नितीन चौगुले यांच्यासाठी जाब विचारत आहेत. त्यामुळे शिवप्रतिष्ठानमधील अंतर्गत गटबाजी समोर आली आहे.
शिवप्रतिष्ठानचे राज्यात लाखो धारकरी आहेत. गडकट मोहिमेमध्ये याची प्रचिती वेळोवेळी येते. संभाजी भिडे यांच्या एका आदेशावर धारकरी मैदानात उतरतात हा इतिहास आहे. तर गुरुजींचा शब्द हा अंतिम मनाला जातो, अशा या एकसंध शिवप्रतिष्ठानमध्ये नितीन चौगुले यांच्यावर झालेल्या निलंबनाच्या कारवाईनंतर शिवप्रतिष्ठानमधील असणारा गृह कलह समोर आला आहे.