Saturday, August 9, 2025
HomeMain Newsसंभाजीराजेंनी सांगितलेला शाहू-होळकर कुटुंबात झालेला विवाह सोहळा तुम्हाला माहित आहे का?

संभाजीराजेंनी सांगितलेला शाहू-होळकर कुटुंबात झालेला विवाह सोहळा तुम्हाला माहित आहे का?

खासदार संभाजीराजे यांनी आज (13 फेब्रुवारी) जेजुरीत अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचं उद्घाटन करताना शाहू घराणं आणि होळकर घराबाबत एक ऐतिहासिक घटना सांगितली. ही घटना म्हणजे महाराष्ट्रातील पहिला आंतरजातीय विवाह शाहू महाराजांनी लावला आणि तोही स्वतःच्या बहिणीचा विवाह होळकर कुटुंबात लावत त्यांनी जातीअंताची हाक दिली. याबाबत अनेकांना फारशी माहिती नाही. म्हणूनच छत्रपती शाहू महाराजांच्या समाज परिवर्तनाच्या आणि समतेच्या लढाईतील या ऐतिहासिक घटनेचा आढावा

भारतात हजारो वर्षांपासून आंतरजातीय विवाहाल बंदी होती. यासाठी रुढीपरंपरावाद्यांकडून कायम धार्मिक ग्रंथांचा आधार घेण्यात आला. पुढे ब्रिटीशांच्या कार्यकाळात देखील 1857 च्या बंडानंतर ब्रिटीशांनी धार्मिक गोष्टींमध्ये सावध भूमिका घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे ब्रिटीश काळातही आंतरजातीय विवाह करण्यावर बंदीच होती. त्यामुळे साधारणतः 100 वर्षांपूर्वी भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचे थोरले बंधू विठ्ठलभाई पटेल यांनी भारतात आंतरजातीय विवाहाला परवानगी मिळाली म्हणून प्रयत्न सुरु केले. त्यावेळी त्यांनी ब्रिटीश कायदेमंडळात आंतरजातीय विवाहाला परवानगी देणारं विधेयकच सादर केलं.

विठ्ठलभाई पटेल यांनी आंतरजातीय विवाहाला परवानगी देणारं विधेयक मांडल्यानंतर देशभरात एकच गदारोळ झाला. सनातन्यांनी आंतरजातीय विवाहामुळे धर्म बुडेल अशी आवई उठवली. रुढी परंपरांच्या समर्थकांच्या या मागणीला लोकमान्य टिळकांनीही पाठिंबा देत आंतरजातीय विवाहाला विरोध केला. त्यांना पुरीचे शंकराचार्यांनीही पाठबळ दिलं. त्यामुळे विठ्ठलभाई पटेल एकटे पडले. मात्र, त्यावेळी स्वतः छत्रपती शाहू महाराज पटेल यांच्या पाठिशी उभे राहिले.

इतकंच नाही तर देशात आंतरजातीय विवाह होण्याआधीच शाहू महाराजांनी आपल्या कोल्हापूर संस्थानात आंतरजातीय विवाहाचा कायदा केला होता. ते एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि लोकांमधील जातीय द्वेष कमी करण्यासाठी 100 आंतरजातीय विवाह करण्याचा संकल्पही केला.

आपला संकल्प पूर्ण करण्यासाठी आणि कृतीतून संदेश देण्यासाठी शाहू महाराजांनी आपल्या घरातूनच आंतरजातीय विवाहाची सुरुवात केली. यासाठी त्यांनी आपली चुलत बहिण चंद्रप्रभाबाई यांचं लग्न इंदुरचे महाराज तुकोजीराव होळकर यांचे पुत्र युवराज यशवंतराव यांच्याशी ठरवलं. हे लग्न व्हावं म्हणून शाहू महाराजांनी स्वतः व्यक्तीगत लक्ष घालत चुलत्यांना समजावलं. तसेच आपल्या विश्वासू सहकार्यांना हे लग्न पार पाडण्यासाठी कामाला लावलं.

त्या काळात मराठा समाजाच्या जातीय अस्मिता खूपच टोकदार होत्या. त्यामुळे समाजात आंतरजातीय विवाहाला पोषक वातावरण तयार करण्यासाठी विद्वान शाहू महाराजांनी धर्माचाही आधार घेत थेट करवीर शंकराचार्यांचा अभिप्राय घेतला. त्यांनीही या विवाहाला मान्यता दिल्यानंतर या लग्नाची जोरदार तयारी सुरु करण्यात आली. शाहू महाराजांनी आपल्या संकल्पानुसार याच लग्नात 100 आंतरजातीय विवाह लावण्यासाठी तुकोजीराव होळकर यांच्याशी चर्चाही केली. करवीर आणि इंदुर संस्थान मिळून हा भव्य विवाह सोहळा पार पाडण्यात येणार होता. या सोहळ्यासाठी त्यावेळी 60 हजार रुपयांची तरतूदही करण्यात आली होती.

मात्र, करवीर घराण्यातील एका राजकुमाराने या लग्नात आडकाठी घातली. शिवाजी महाराजांच्या घराण्यातील मुलीचं लग्न इतर जातीशी करु नये असा सुर काही लोकांनी काढला. यानंतर समाज सुधारणेच्या या चांगल्या कामावरुन छत्रपती घराण्यातच वाद निर्माण झाल्याने शाहू महाराज नाराज झाले. त्यानंतर या लग्नाचा विषय काही वर्षे रेंगाळला आणि अखेर फेब्रुवारी 1924 मध्ये चंद्रप्रभाबाई घाटगे आणि यशवंतराव होळकर यांचा विवाह संपन्न झाला. मात्र, हे लग्न पाहण्यासाठी त्यावेळी शाहू महाराज जीवंत नव्हते. याआधी 2 वर्षांपूर्वीच शाहू महाराजांचं निधन झालं होतं. लग्नानंतर चंद्रप्रभाबाई घाटगे यांचं नाव संयोगितादेवी असं ठेवण्यात आलं. लग्नानंतर चंद्रप्रभाबाई उर्फ संयोगितादेवी आणि यशवंतराव या दोघांनी इंग्लंडमध्ये जाऊन शिक्षण घेतलं.

शाहू महाराजांनी नागपूरमध्ये डिप्रेस क्लास मिशनच्या अधिवेशनात 30 मे 1920 रोजी त्यांचा आंतरजातीय विवाहाकडे बघण्याचा दृष्टीकोनही स्पष्ट केला होता. ते म्हणाले होते, “समाजात जितके जास्त आंतरजातीय विवाह होतील तेवढ्या प्रमाणात भारतीय समाजातील जातीभेद नष्ट होतील. जेवढा समजातील जातीभेद कमी होईल तेवढी आपल्या देशाची प्रगती होईल.”

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments