श्रीमंत लोकांचा गरीब देश अशी ख्याती गेल्या काही वर्षापासून भारताबद्दल असून ऑक्सफॅमच्या अहवालातून ते काही प्रमाणात खर होताना दिसत आहे. ऑक्सफॅम याने प्रसिद्ध केलेल्या अहवालात गरीब आणि श्रीमंतांमधील आर्थिक दरी पुन्हा वाढत असल्याचं दिसले आहे. भारतातील १० टक्के लोकांकडे देशातील एकूण संपत्तीच्या ७७.४ टक्के इतकी संपत्ती आहे. देशातील एकूण संपत्तीच्या ५१.५३ टक्के इतकी संपत्ती या १० टक्क्यांपैकी १ टक्का मंडळीकडे आहे. तर ६० टक्के लोकसंख्येकडे केवळ ४.८ टक्के संपत्ती आहे. ऑक्सफॅम अहवालातून ही आकडेवारी समोर आली आहे.
दर वर्षी दाओसमध्ये होणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या पूर्वी ऑक्सफॅम अहवाल जाहीर होतो. देशातील अब्जाधीशांची संख्या ११९ इतकी असून गेल्या वर्षी देशातील अब्जाधीशांची संख्या १८ नं वाढली आहे. त्यांच्याकडे तब्बल २८ लाख कोटींची संपत्ती आहे. २०१८ ते २०२२ या काळात भारतातील श्रीमंतांच्या संख्येत प्रत्येक दिवशी ७० जणांची वाढ होईल, असा अंदाज ऑक्सफॅम अहवालानं वर्तवला आहे. देशातील केवळ ९ टक्के श्रीमंत लोकांकडे असलेली संपत्ती आणि ५० टक्के गरीब लोकांकडे असलेली संपत्ती जवळपास सारखीच आहे.
विशेष म्हणजे देशातील सध्याच्या कोट्याधीशांच्या संपत्तीत २०१८ मध्ये प्रत्येक दिवसाकाठी २२०० कोटी रुपयांची वाढ नोंदवण्यात आली. देशातील १ टक्का लोकांची संपत्ती गेल्या वर्षभरात ३९ टक्क्यांनी वाढली आहे.
ऑक्सफॅमच्या अहवालानुसार, गेल्या वर्षभरात भारतातील जवळपास निम्म्या लोकसंख्येची आर्थिक प्रगती अतिशय संथगतीनं झाली आहे. ५० टक्क्यांहून अधिक लोकांच्या संपत्ती वाढीचा वेग केवळ तीन टक्के इतका आहे. जागतिक स्तरावरील आकडेवारी विचारात घेतल्यास कोट्याधीशांच्या संपत्तीत दर दिवशी १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर गरिबांच्या संपत्तीत ११ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे.



