अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण होताना पाहायला मिळाली. आगामी अर्थसंकल्पात केंद्र सरकार कोणते निर्णय घेणार, याची चिंता गुंतवणुकदारांना आहे. गुंतवणुकदारांनी बुधवारीही नफेखोरी सुरु ठेवल्याने सेन्सेक्सचा आलेख आणखी खाली आला.
आज दिवसभरात सेन्सेक्स जवळपास 1 हजार अंकांनी तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक असलेला निफ्टी 291 अंकांनी कोसळून 14 हजाराच्या खाली गेला आहे. गेल्या चार दिवसांमध्ये सेन्सेक्स जवळपास 2,350 अंकांनी खाली घसरला आहे. त्यामुळे सध्या सेन्सेक्स 47,390.93 च्या पातळीवर आहे. या घसरणीचा सर्वाधिक फटका बँकांना बसला आहे. जवळपास सर्वच बँकांच्या समभागांमध्ये विक्रमी घसरण नोंदवण्यात आली आहे.
21 जानेवारीला सेन्सेक्सने 50 हजारांचा विक्रमी टप्पा ओलांडला होता. त्यानंतर लगेचच बाजारात नफेखोरी सुरु झाल्याने सेन्सेक्स सातत्याने खाली घसरत आहे. आज मुंबई शेअर बाजारातील 2987 लिस्टेड कंपन्यांपैकी 1930 कंपन्यांच्या समभागांची (Shares) किंमत घसरली. गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या या पडझडीत गुंतवणुकदारांचे 189.31 लाख कोटी पाण्यात गेले आहेत.
अॅमेझॉनकडून फ्युचर ग्रुप आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या व्यवहारात कायदेशीरमार्गाने अडथळा आणला जातोय. त्याची परिणती रिलायन्सच्या समभागाची किंमत घसरण्यात झाली. आज रिलायन्स इंडस्ट्रीजचा समभाग 51 रुपयांनी घसरुन 1890 च्या पातळीवर स्थिरावला.
गेल्या काही दिवसांपासून गुंतवणूकदार सोन्यात गुंतवणुकीला जास्त प्राधान्य देत आहेत. जागतिक स्तरावर घडणाऱ्या घडामोडींचा सोन्याच्या किमतींवरही परिणाम दिसून येत आहे. अमेरिकेत झालेले सत्तांतर आणि कोरोना लसीकरणाच्या बातम्यांमुळे सोन्याच्या भावात चढ-उतार (Gold Silver Rate Today) पाहायला मिळतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर बदलत असलेल्या किमतींचा परिणाम स्थानिक बाजारांवरही दिसून येतो. तसेच डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत होत असल्याचा परिणामही सोन्याच्या दरांवर होत असतो. विशेष म्हणजे सोन्याचे दर स्थिर असले तरी चांदीच्या दरात प्रतिकिलो 200 रुपयांची घसरण झालीय.
मुंबईतील सोने चांदीचे दर
22 कॅरेट सोने : 48, 330 रुपये
24 कॅरेट सोने : 49, 330 रुपये
चांदीचे दर : 66500 रुपये (प्रतिकिलो)