राष्ट्रवादी युवा काँग्रेसचं राज्यव्यापी शिबिर महाबळेश्वर इथं आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिराच्या समारोप कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हजेरी लावली. यावेळी शरद पवार यांनी तरुण नेत्यांशी संवाद साधला. राज्यात पुढे महापालिका, नगरपालिकेच्या निवडणुका आहेत. यासाठी कार्यकर्त्यांना जागरुक करण्याची गरज आहे. आगामी निवडणुकींच्या तयारीसाठी हा मेळावा असल्याचं शरद पवार यांनी यावेळी म्हटलं
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते आमदार शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला. राष्ट्रवादीतून बंडखोरी केलेले ज्ञानदेव रांजणे विजयी झाले. पराभवानंतर शशिकांत शिंदे यांनी माझ्या पराभवामागे मोठं कारस्थान रचण्यात आलं होतं, असं म्हटलं होतं.
या पराभवानंतर शरद पवार यांनी काल शशिकांत शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर आज पहिल्यांदाच शशिकांत शिंदे यांच्या पराभवावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली.
शशिकांत शिंदे यांच्या पराभवाच्या खोलात गेलो नाही, पण शशिकांत शिंदे यांनी ही निवडणुकू अधिक गांभीर्याने घ्यायला हवी होती, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. सहकारी संस्थांच्या निवडणूका पक्ष म्हणून लढवत नाही, असंही ते म्हणाले.
जिल्हा बँकेचे चांगले निकाल लागले, सांगलीतील निकाल सकारात्मक होता, अशी प्रतिक्रियाही शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.