Saturday, August 9, 2025
HomeMain Newsशरद पवार 25 जानेवारीला शेतकरी आंदोलनात सहभागी होणार

शरद पवार 25 जानेवारीला शेतकरी आंदोलनात सहभागी होणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे येत्या 25 जानेवारी रोजी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आझाद मैदानात होत असलेल्या आंदोलनात सहभागी होणार आहेत. प्रजासत्ताक दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना संबोधित करत असतात. त्याच्याच एक दिवस आधी पवार हे शेतकरी आंदोलनात सहभागी होणार आहेत. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात शेतकरी आंदोलनाची दखल घ्यावी, यासाठीची पवारांची ही खेळी असल्याचं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे.

दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी २३, २४, २५ जानेवारी रोजी आझाद मैदान येथे शेतकरी आंदोलन होत आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शरद पवार हे २५ जानेवारी रोजी आझाद मैदानात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. या शेतकरी आंदोलनाला राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने कृषी कायद्याला विरोध केला आहे. आता या आंदोलनात महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष आणि त्यांचे नेते व मुख्यमंत्रीही सहभागी होणार आहेत, असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

शरद पवार शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी झाल्यास ती आपोआपच राष्ट्रीय बातमी होणार आहे. दिवसभर सर्व मीडियात आणि दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात या बातमीला ठळक स्थान मिळेल. त्यामुळे भाजपवर आपोआपच या आंदोलनामुळे दबाव येणार आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घ्यावी यासाठी पवारांनी प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी या आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला असावा असं राजकीय निरीक्षक सांगतात. दरम्यान, पवार यांनी सरकारला शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्याचा अल्टिमेटम दिला होता. मात्र, केंद्राने त्याकडे दुर्लक्ष केलं आहे. या पार्श्वभूमीवर पवार आंदोलनात सहभागी झाल्यास शेतकरी आंदोलनाला आणखी हवा मिळण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments