Tuesday, February 17, 2026
HomeMain Newsविलासपूरमध्ये नाल्याच्या कामावरून तणाव दत्त मंदिर परिसर धोक्यात, नागरिकांचा उपोषणाचा इशारा

विलासपूरमध्ये नाल्याच्या कामावरून तणाव दत्त मंदिर परिसर धोक्यात, नागरिकांचा उपोषणाचा इशारा

विलासपूर परिसरात विकासकामांच्या नावाखाली सुरू असलेल्या नाल्याच्या कामावरून स्थानिक नागरिक आणि भाविकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. अथर्व अपार्टमेंटसमोरील नाल्याचे काम मूळ आराखड्यानुसार सरळ मार्गाने जाणार असताना काहींच्या विरोधानंतर ते वळवून थेट दत्त मंदिराच्या बाजूने नेण्यात येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित नाला कोयना सोसायटीला लागून सहजीवन सोसायटीमार्गे सरळ जाणार होता. मात्र, “चार बोटांचा चढ लागतो” या कारणावरून तो अचानक दत्त मंदिराच्या बाजूला वळवण्यात आला. दत्त मंदिर परिसर भौगोलिकदृष्ट्या खालच्या भागात असल्याने पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर येथे साचते. त्यातच नव्याने गटाराचे पाणी वळवले गेल्यास मंदिर परिसरात आणि आजूबाजूच्या घरांमध्ये पाणी शिरण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

या निर्णयामुळे मंदिर परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण होईल व धार्मिक भावना दुखावल्या जातील, अशीही भावना भाविकांनी व्यक्त केली आहे. “जे गटार सरळ जात असताना मंदिराच्या बाजूला वळवण्याची गरज काय?” असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

दरम्यान, या कामासाठी आवश्यक मंजुरी, अंदाजपत्रकातील तरतूद व वर्क ऑर्डर नसताना काम सुरू असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. ठेकेदार मनमानी पद्धतीने काम करत असून नगरपालिकेकडून कोणतीही कारवाई होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

परिस्थिती वेळेत नियंत्रणात न आणल्यास विलासपूर परिसरातील नागरिक व दत्त मंदिराचे भाविक एकत्र येऊन मा. जिल्हाधिकारी, सातारा यांच्या कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा देण्यात आला आहे. धार्मिक स्थळांचे पावित्र्य राखणे ही नगरपालिकेची जबाबदारी असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून वादग्रस्त काम थांबवावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

दरम्यान, या प्रकरणी नगरपालिकेची अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. मात्र, वाढत्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास विलासपूरमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments