पॅरिस ऑलम्पिक 2024 मध्ये कुस्तीत देशाला सुवर्णपदक मिळेल, अशी आशा असलेल्या देशवासीयांना आज चांगलाच धक्का बसला. कुस्तीपटू विनेश फोगटवर अंतिम सामन्यासाठी अपात्रतेची कुऱ्हाड कोसळली. कुस्ती क्षेत्रासह देशवासीयांना दुःखद प्रसंगाला सामोरं जावं लागलं. विनेश फोगटच्या अपात्रतेबद्दल अत्यंत दुःख झाल्याची भावना माजी हिंदकेसरी पैलवान दिनानाथ सिंह यांनी व्यक्त केली. तर आंतरराष्ट्रीय स्पर्धेदरम्यान कुस्तीपट्टुनी नियमांचं भान ठेवायला हवं, असा सल्लाही सिंह यांनी कुस्तीपटूंना दिला आहे.
संमिश्र प्रतिक्रिया : भारताची कुस्तीपटू विनेश फोगटनं पॅरिस ऑलिंपिकमध्ये यंदा 50 किलो वजनी गटात अंतिम फेरीत प्रवेश केला होता. उपांत्य सामन्यात क्युबाच्या कुस्तीपटूवर मात करत विनेशनं अंतिम फेरी गाठली होती. मात्र, आज सकाळी अंतिम फेरी आधी खेळाडूंचं वजन करताना विनेशचं वजन 50 किलोपेक्षा अधिक भरल्यानं आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक स्पर्धेच्या कमिटीनं विनेश फोगटला अंतिम फेरीतून अपात्र करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पंतप्रधानांपासून कुस्ती क्षेत्रातील दिग्गजांपर्यंत सर्वांनाच धक्का बसला. कुस्तीची पंढरी असलेल्या कोल्हापुरात अनेक प्रशिक्षक आणि कुस्तीपटूंनी विनेश फोगट हिच्याबद्दल दिलेल्या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
माजी हिंदकेसरी दीनानाथ सिंह काय म्हणाले : “कुस्तीतील अनेक खेळाडूंना वजन कमी करुन खालच्या वजनी गटात खेळण्याची सवय असते. मात्र, कुस्तीसारख्या शरीराचा दम काढणाऱ्या खेळात तोंडावरही कंट्रोल असायला हवा. फक्त पाणी पिल्यानंतरही खेळाडूंचं वजन वाढतं. त्यामुळं तसंच काहीसं विनेश फोगटच्या बाबतीत झालं असावं, असा अंदाज माजी हिंदकेसरी खेळाडू दीनानाथ सिंह यांनी व्यक्त केला. तर ऑलम्पिकसारख्या जागतिक दर्जाच्या खेळात खेळाडूंनी सर्व नियमांचे पालन करायला हवं,”असंही दीनानाथ सिंह ‘ईटीव्ही भारत’शी बोलताना सांगितलं.
काय म्हणाले काका पवार : कुस्तीपटू विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्यात आल्याबाबत कुस्ती प्रशिक्षक काका पवार म्हणाले, “काल रात्री संपूर्ण भारतीय आनंदात होते. सगळ्यांना वाटलं होतं की आपण सुवर्णपदक जिंकणार आहोत. पण सकाळी आलेल्या बातमीनं खूपच निराशा झाली. तिला अपात्र करण्यात आलं आहे. यामुळं आपण तिन्ही पदकांमधून बाहेर पडलो आहे.” ” नियमाबाबत बोलायचे झाले तर एका गटात जर 50 किलो वजनाचे असतील तर त्या गटातील कुस्ती पहिल्या दिवशी समाप्त करायची असते. त्याच दिवशी सुवर्णपदकासाठी कुस्ती लढायला पाहिजे होती. पण कुस्ती का लढविण्यात आली नाही, याबाबत माहीत नाही. ती वजनामुळं अपात्र झाली आहे. यामुळं यात कोणीही अन्याय केला, असा भाग नाही,” असंही यावेळी काका पवार म्हणाले.