ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर टीम इंडियाचे शिलेदार भारतात परतले. देशातील विविध शहरांमधील विमानतळावर तसेच त्यांच्या राहत्या घरी या खेळाडूंचे शानदार स्वागत करण्यात आले. गोलंदाज मोहम्मद सिराज हैदराबाद विमानतळावर पोहचला. सिराज विमानतळावरुन घरी न जाता परस्पर आपल्या वडिलांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कब्रस्तानात पोहचला. यावेळेस तो भावूक झाला.
सिराज सकाळी 9 च्या दरम्यान हैदराबादमधील कब्रस्तानात पोहचला. सिराजने आपल्या वडिलांच्या कबरीवर फुले वाहून श्रद्धांजली अर्पण केली. तसेच त्याने नमाज अदा केली. वडिलांना श्रद्धांजली वाहताना सिराज भावूक झाला होता. त्याचे हे फोटो व्हायरल होत आहेत. टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना सिराजचे वडिल मोहम्मद गौस यांचं 20 नोव्हेंबरला निधन झालं. त्यांना फुप्फुसाचा आजार होता. भारतीय संघ कोरोना नियमांनुसार बायोबबलमध्ये होता. बीसीसीआयने सिराजला भारतात जाण्यासाठी क्वारंटाईन नियमांमधून सवलत दिली. पण सिराजने अशा भावनिकप्रसंगी राष्ट्राला प्राधान्य दिलं. सिराजच्या या निर्णयाचं कौतुक करण्यात आलं.
सिराजला वडिलांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहता आले नाही. पण सिराजने फोनवरुन आई आणि भावासोबत संवाद साधला. यावेळेस “आपल्या वडिलाचं स्वप्न पूर्ण कर”, असा सल्ला आईने दिल्याचं सिराजने सांगितलं. “मला घरच्यांनी प्रेरणा दिली, धीर दिला. या पाठिंब्यामुळे मला बर्याच मानसिक शक्ती मिळाल्याचं सिराज म्हणाला. “आपल्या मुलाने देशाचं प्रतिनिधित्व करावं. त्याला खेळताना जगाने पहावे, अशी वडिलांची इच्छा होती. ते आज असते तर त्यांना आनंद झाला असता. वडिलांच्या आशिर्वादामुळेच मी 5 विकेट्स घेऊ शकलो. यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजतो. भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत”, असं सिराज म्हणाला.
मोहम्मद शमी दुखापतग्रस्त झाल्याने मोहम्मद सिराजला ऑस्ट्रेलियाविरोधातील दुसऱ्या कसोटीतून पदार्पण करण्याची संधी मिळाली. मोहम्मद सिराजला अनुभवी फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने कॅप देऊन टीम इंडियाच्या प्लेइंग इलव्हेनमध्ये स्वागत केलं. सिराज हा टीम इंडियाकडून कसोटी पदार्पण करणारा 298 वा खेळाडू ठरला. पदार्पणातील सामन्यात त्याने 5 विकेट्स घेतल्या.
तिसऱ्या कसोटी सामन्याआधी राष्ट्रगीतादरम्यान सिराजला अश्रू अनावर झाले. यावेळेस संघ सहकाऱ्यांनी तसेच भारतीयांनी सिराजला भावनिक दाद दिली. मला राष्ट्रगीतावेळेस वडिलांची आठवण आली. यामुळे मला रडू कोसळल्याचं सिराजने सांगितलं.
सिराज ऑस्ट्रेलियाविरोधातील कसोटी मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. सिराजने या 4 सामन्यातील मालिकेतील 3 सामन्यांमध्ये एकूण 13 विकेट्स घेतल्या. दरम्यान आता टीम इंडिया इंग्लंडविरोधात एकूण 4 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. यातील पहिल्या 2 कसोटींमध्ये सिराजची निवड करण्यात आली आहे. सिराज या इंग्लंडविरोधातील 2 कसोटींमध्ये कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.