रात्री 10 च्या सुमारास स्नेहालय चे संस्थापक डॉ गिरीष कुलकर्णी यांचा फोन आला.. “गुंजन …. वरुड तालुक्यातील एका 20 दिवसाच्या बाळाला स्नेहांकूर (अहमदनगर) ला घेऊन जायचे आहे ताबडतोब.. हे काम फक्त तूच फत्ते करु शकतेस, म्हणुन तुला कॉल केला”..
सर्व घटना नीट एकून घेऊन लगेच निघाले.. सुमारे 90 km अमरावती ते वरुड अंतर पार करेपर्यन्त जीवात जीव नव्हता. कारण एका नवजात लेकराच्या जीवन-मरणाचा प्रश्न होता..
एक विवाहित स्त्रीला अनैतिक संबंधातुन मुलगा जन्माला आला व त्याला जवळ ठेवणे हे तिला व तिच्या आई-वडिलांना मुळीच शक्य नव्हते म्हणुन बाळाला चक्क फेकून देणे किवा मारून टाकणे हाच शेवटचा पर्याय त्यांनी वापरण्याचे ठरविले होते. हे सर्व ऐकून माझी तळपायची आग मस्तकात गेली व विचारांचे अजब काहूर माजले त्याचक्षणी.. गेल्याबरोबर मी बाळ कुठाय म्हणुन खांडेकर म्याम ला विचारणा केली, त्यांनी बाळाला हातात आणले..त्या चिमुकल्या पिल्लाला पटकन छातीशी घेऊन एक दिर्घ श्वास सोडला व त्याच्या आईला वर म्याम च्या घरात यायला सांगितले. सर्व परिस्थिति समजून घेतली. ती स्त्री खुप काही खोटं बोलत होती. मला चीड़ आली (स्वताच्या हलगर्जिपणामुळे एका निष्पाप जीवाला मारून टाकण्यापर्यंत काळीज धजावते तरी कसे या स्वार्थी लोकांचे) पण मी कंट्रोल केले. “माझी चूक झाली मैडम मला माफ़ करा” म्हणत ती रड़ू लागली. मी पुन्हा बाळाला एकटक बघू लागले. अगदी गोड, सुंदर ते पिल्लू कसलिहि चिंता न करता मस्त झोपुन होते माझ्या कुशीत.. मलाच रड़ू आले.. (त्याच्या अंगावर कुठेच मला ‘तो अनैतिक असल्याचा डाग’ दिसला नाही)
स्पेशल गाड़ी करुन मी बाळाला व त्याच्या आईला घेऊन नगर ला निघाले. सुमारे 700 km च्या प्रवासात कित्येकदा मी त्या बाळाला बघुन फक्त आसवे गाळीत होते. औरंगाबाद ला पोहचल्यावर त्याच्या साठी मी एक स्वेटर घेतला व त्याला तो घातला. (त्याच्या अंगावर तोडके व जूने कपड़े होते). मध्यरात्री स्नेहालयात पोहचलो. आमची राहण्याची सोय अगोदरच अजय वाबळे (स्नेहांकुर) यांनी करुन ठेवली होती. बाळाच्या आईला क्षणात झोप लागली मी मात्र सकाळी 4:30 पर्यन्त online होते. कारण बाजूला बाळ व डोक्यातील विचार मला झोपुच देईनात. रात्री कित्येकदा त्या बाईला मी मोठ्याने ओरडून उठवले व त्याला दूध पाजायला लावले. भयंकर राग आला होता मला तीचा तेव्हा. आपले बाळ उद्यापासून आपल्याजवळ राहणार नाही याची चिंता तिला नसावी का? आणि असेल तर मग एवढी निश्चिन्त ती कशी झोपु शकते? माझी झोप पुन्हा गायब. सकाळी 6 ला मी उठले. स्नेहालयाला एक चक्कर मारली. परत तीला उठवून फ्रेश व्हायला सांगितले व चहा-नाश्ता घेऊन स्नेहाधार ला बाळाला घेऊन गेले. समोर गेटवरच गिरीश बाबा दिसले अगदी धावत जाऊंन मी त्यांना मीठी मारली.”गुंजनताई तुझ्या या धाडसाला आमचा खुप खुप सलाम आहे” म्हणत मला पुन्हा जवळ घेतले. तब्बल 1 वर्षांनंतर मी त्यांना भेटत होते. फार ऊर्जा भेटते मला बाबांना भेटून, अफलातून व्यक्तिमत्व आहे हे..
सर्व कागदपत्रे व बयान देऊन आम्ही बाळाला स्नेहांकुर ला सुपुर्त केले. गिरीश बाबा, अजय वाबळे, रोहीत परदेशी, संदीप सर यानी स्पेशल माझ्यासाठी एक सत्कार समारंभ आयोजित केला होता..फार भारावून गेले मी त्या सर्व प्रेमानी. माझ्याबद्दल एवढे भरभरून ते सर्व जण बोलत होते व मी माझ्या आसवांना लपवत होते. गौरव पत्र व पुस्तक देऊन माझा सन्मान केला गेला. प्रेक्षकांमधून रोहित दादा मोठ्यानी बोलला “देश की बेटी कैसी हो…..गुंजनताई जैसी हो” तेव्हा अंगावर शहारा आला.. आमच्या गाडीचे ड्राइव्हर काका प्रेक्षकांमधे बसून होते. मॅडम तुमच्या रूपाने मला आज देव दिसला म्हणत ते आपल्या डोळ्यातील आसव लपवत होते. खुप वेगळं होत सर्व. लवकरच निघायचे होते अमरावतीला. पण जाताना परत एकदा त्या पिल्लाला जाऊन छातीशी कवटाळले. यापुढिल त्याचे भविष्य हे उज्ज्वल असणार यात शंका नाही या विचाराने आनंदी होऊन तेथून निघाले दुसऱ्या दिवशी अमरावतीला पोहचले व बाळाच्या आईला तिच्या घरी सोडून दिले.
(आज ते बाळ अमेरिकेतील एका दाम्पत्याने दत्तक घेतले आहे.. आयुष्याचे सार्थक झाल्यागत वाटते मला)
(समस्त भारतात कुठेही अनैतिक सम्बंधातुन जन्मलेल्या बाळाला कृपया मारू किंवा फेकून देऊ नका. त्याचा आजन्म सांभाळ आम्ही करु, फक्त एक कॉल किवा msg करा ही माझी नम्र विनंती)
गुंजन गोळे(अमरावती)
8379858765