जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन आणि फ्यूचर ग्रुप यांच्यात सुरू असलेल्या कायदेशीर लढाईदरम्यान बिग बाजारसाठी काम करणार्या महिला गटाने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संपर्क साधलाय. आज त्यांनी आपला उदरनिर्वाह वाचविण्यासाठी या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचे आवाहन केलेय. पीएम मोदी यांना लिहिलेल्या पत्रात बिग बाजार एसओएस समूहाच्या महिलांनी असे म्हटले आहे की, फ्यूचर रिटेल आणि रिलायन्स यांच्यात एक करार झाला आहे, ज्या अंतर्गत रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) फ्यूचर रिटेल स्टोअर चालवणार आहे. रिलायन्सने फ्यूचर रिटेलच्या पुरवठादार आणि विक्रेत्यांना सर्व थकबाकी देण्याचे आश्वासनही दिलेय.
महिलांच्या उदरनिर्वाहावर धोक्याची टांगती तलवार
आंतरराष्ट्रीय महिला दिन 2021 च्या निमित्ताने पंतप्रधानांना पाठवलेल्या या पत्रात असे म्हटले आहे की, कोरोना व्हायरस सर्व देशभर पसरलेला असताना आम्हाला खूप त्रास सहन करावा लागतोय, या कराराने आमचा उदरनिर्वाह सुरक्षित होणार आहे. परंतु हा करार थांबविण्यासाठी अॅमेझॉनच्या प्रयत्नांनी आपल्या आणि आमच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाह धोक्यात आलाय.
फ्यूचर ग्रुपशी 2 लाखांहून अधिक महिला संबंधित
बिग बझारशी संबंधित या गटाचा असा दावा आहे की, यात 2 लाखांहून अधिक महिला कंपनीशी संबंधित आहेत. यापैकी सुमारे 10000 महिलांचा फ्यूचर ग्रुपशी थेट संबंध आहे, तर इतर दोन लाख महिला आपल्या गटाद्वारे अप्रत्यक्षरीत्या पैसे कमवतात. हे महिला गट फ्यूचर समूहाच्या बिग बझार ब्रँडसाठी उत्पादने पुरवतात. समूहाचे इतर ब्रँड एफबीबी सेंट्रल ब्रांड फॅक्टरी ईजीडे हेरिटेज सिटी डब्ल्यूएच स्मिथ आणि 7-इलेव्हन अनेक उत्पादनांचा पुरवठा करतात. नोकरी गमावल्यानंतर त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसणार असल्याचे या गटाने म्हटले आहे. परिणामी, त्यांना अडचणीतून जावे लागू शकते.
छोट्या व्यापाऱ्यांच्या फ्युचर ग्रुपवर 6,000 कोटींची थकबाकी
महिला समूहाने असे म्हटले आहे की, जर फ्यूचर ग्रुप-रिलायन्स दरम्यान झालेल्या करारामुळे अॅमेझॉनला हस्तक्षेप करण्याची परवानगी मिळाली, तर त्याचा परिणाम या लहान शहरांमध्ये रोजीरोटी टिकवणाऱ्या महिला गटांवर होईल. देशातील सुमारे 6,000 छोटे व्यापारी आणि पुरवठादारांच्या फ्युचर ग्रुपवर 6,000 कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे.
काय आहे प्रकरण?
फ्यूचर ग्रुप आणि अॅमेझॉन सध्या कायदेशीर लढाई लढत आहेत. फ्यूचर ग्रुपचा रिटेल आणि होलसेल व्यवसाय रिलायन्स रिटेलला विकण्याचा करार झालाय, ज्यामध्ये अॅमेझॉनने आक्षेप नोंदविलाय. दोन्ही बाजूंनी हे प्रकरण अनेक कायदेशीर बाबीत अडकलेय.