गमपल्ली मुंबई देवगिरी एक्स्प्रेसमध्ये मध्यरात्री अंदाजे एक ते दीड महिन्याची चिमुकली शौचालयात आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. हा प्रकार रेल्वेत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लक्षात आल्यानंतर त्यांनी मनमाड येथे गाडी पोहोचताच पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर गाडीमध्ये या बाळासंदर्भात चौकशी करण्यात आली. मात्र, कोणीही त्याची जबाबदारी घेतली नसल्यानं अखेर रेल्वे पोलीस ठाणे, मनमाड येथे याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली.
नांदेड येथून लिंगमपल्ली मुंबई देवगिरी एक्स्प्रेसमध्ये कर्तव्यावर असणारे अयलया बुकीया राजिया यांनी तक्रारीत म्हटलंय की, ते 8 सप्टेंबर रोजी रात्री 7 वाजेपासून ट्रेन नं 17058 अप लिंगमपल्ली मुंबई देवगिरी एक्स्प्रेसमध्ये A/1, A/2, A/3, H/1, B/4 या कोचमध्ये त्यांची ड्यूटी होती. सदर गाडी छत्रपती संभाजीनगर येथून निघाल्यानंतर A/3 कोच मधील सीट नं 45 वरील प्रवाशानं मला येऊन घटनेची माहिती दिली. तेथे जाऊन चौकशी केली असता रेल्वेच्या शौचालयात एक-दीड महिन्याची बेवारस चिमुकली आढळली.
अयलया बुकीया राजिया यांनी घडलेल्या घटनेची माहिती नांदेड येथील रेल्वे कमर्शियल कंट्रोल रुमला कळवली. त्यानंतर रेल्वे स्टेशन मनमाड येथे GRP आणि RPF यांना ट्रेन अटेंड करण्याबाबत सांगण्यात आलं. सदर गाडी रेल्वे स्टेशनला पोहोचल्यानंतर GRP यांनी बाळाला आपल्या ताब्यात घेतलं. त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. तर पोलीस सध्या बाळाच्या आई-वडिलांचा शोध घेत आहेत.