लोकसभेतील खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपलं सरकारी निवासस्थान अखेर सोडलं आहे. राहुल गांधी 2005 पासून तुघलक लेनमधील सरकारी बंगल्यात वास्तव्य करत होते. सूरत कोर्टाने अब्रुनुकसानीच्या खटल्यात त्यांनी दोषी ठरवल्यानंतर लोकसभा सचिवालयाने त्यांची खासदारकी रद्द केली होती. यानंतर राहुल गांधी यांना नियमाप्रमाणे आपलं सरकारी निवासस्थान सोडावं लागलं आहे, राहुल गांधी यांनी घऱ सोडल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सत्य बोलण्यासाठी आपण कोणतीही किंमत मोजण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे.
राहुल गांधी यांनी 2019 मध्ये निवडणूक प्रचारसभेत सर्व चोरांचं आडनाव मोदी आहे असं म्हणत अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता. याप्रकरणी त्यांच्याविरोधात सूरत कोर्टात अब्रूनुकसानीचा खटला टाकण्यात आला होता. याप्रकरणी सूरत कोर्टाने त्यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. मात्र त्यानंतर त्यांना लगेच जामीनही मंजूर करण्यात आलं होतं.
राहुल गांधी यांनी सूरत कोर्टाच्या निर्णयाला आव्हान दिलं होतं. पण कोर्टाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिला. यावरुन राहुल गांधी यांनी टीका करताना आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत असल्याने आपल्याला लक्ष्य करण्यात येत असल्याचं म्हटलं आहे.