65वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात यंदा मोठा वाद उफाळून आलाय. केवळ 11 पुरस्कार विजेत्यांनाच राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. मात्र, या निर्णयाला इतर विजेत्या कलाकारांनी तीव्र विरोध केला. राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार वितरण न झाल्यानं 65 पुरस्कार विजेत्यांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे.
यावेळी 131 पैकी 65 विजेत्यांनी या पुरस्कार वितरण सोहळ्याकडे पाठ फिरवली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे कार्यक्रमाच्या ठिकाणी साडेपाच वाजता उपस्थित राहणार होते. परंतु माहिती प्रसारणमंत्री स्मृती इराणी यांनी राज्यमंत्री हर्षवर्धन राठोड आणि सचिव नरेंद्र कुमार सिन्हा यांच्या उपस्थितीत साडेतीन ते साडेपाचच्यादरम्यान अनेक विजेत्यांना पुरस्कार दिले. या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त करत 65 पुरस्कार विजेत्यांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला.
मागील 64 वर्षांपासून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हे राष्ट्रपतींच्या हस्ते देण्याची प्रथा आहे. परंतु ही प्रथा भाजपा सरकारनं मोडीत काढली. राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळणार नसल्यामुळे अनेक पुरस्कार विजेत्यांनी निषेध करत पुरस्कार सोहळ्याकडेच पाठ फिरवली.