राष्ट्रवादी काँग्रेसने कोल्हापूर आणि सांगलीतील पूरग्रस्तांसाठी 50 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे. राष्ट्रवादीचे आमदार आणि खासदार एक महिन्याचं वेतन या नैसर्गिक आपत्तीसाठी देतील आणि हा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात येईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Sharad Pawar) यांनी दिली. या परिस्थितीमध्ये सर्वांनी मदतीसाठी पुढे यावं, असं आवाहनही शरद पवारांनी (NCP Sharad Pawar) केलं.
पुण्यात पत्रकार परिषद घेऊन शरद पवारांनी ही घोषणा केली. माझ्या राजकीय कारकीर्दीत कधीही असा पूर पाहिला नव्हता. यामध्ये सर्वसामान्यांचं मोठं नुकसान झालंय. शेतीमधील माती वाहून गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे पाणी ओसरल्यानंतर राज्य सरकारने तातडीने लोकांना मदत देण्याची गरज आहे, असं शरद पवार म्हणाले. यासाठी सर्वांनी पुढे येऊन गरज करावी, महाराष्ट्राची ही परंपरा आहे, असं आवाहनही शरद पवारांनी केलं.