राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यामुळे या भेटीचे राजकीय अर्थ काढले जात असून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. मागच्यावेळीही पवार मोदींना भेटले होते. त्यावेळी मोदींनी त्यांना थेट सोबत काम करण्याची ऑफर दिली होती. त्यामुळे या भेटीतही मोदींनी पवारांना अशीच काही ऑफर दिलीय का? याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.
आजच्या भेटीत काय झालं?
पवारांनी आज मोदींची भेट घेतली. सोमवारी लोकसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली. या भेटीवरून तर्कवितर्क लढवण्यात येत आहे. मात्र, पवारांनी ट्विट करून त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. मोदींसोबतच्या भेटीत राष्ट्रीय हिताच्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली, असं पवारांनी म्हटलं आहे.
शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 20 नोव्हेंबर 2019 रोजी संसदेत भेट झाली होती. विदर्भातील अतिवृष्टीच्या प्रश्नावर पवारांनी मोदींची भेट घेऊन चर्चा केली होती. या भेटीबाबत आणि भेटीतील तपशीलाबाबत पवारांनीच मीडियाला माहिती दिली होती. विदर्भातील अतिवृष्टीतील बैठकीनंतर उठायला लागल्यावर मोदींनी मला थांबवलं. आपण एकत्र येऊन काम केल्यास मला आनंद होईल, असं मोदी मला म्हणाले. त्यावर, नरेंद्र भाई, आपले व्यक्तिगत संबंध चांगले आहेत. ते राहतील. पण आपण एकत्र काम करणं राजकीय दृष्ट्या मला शक्य नाही, असं मी त्यांना सांगितलं. तेव्हा का नाही?, असा सवाल त्यांनी मला केला. अनेक गोष्टीत तुमची आणि आमची भूमिका समान आहे. विकास, शेती आणि उद्योगाच्या बाबतीत आपली एकच भूमिका आहे. आमची भूमिका वेगळी नाही. मतभिन्नता कुठे आहे? आपण सर्वांनी एकत्र येऊन देशासाठी काम करावं आणि तुमच्या सारख्या अनुभवी नेत्यांनी यात सहभागी व्हावं अशी माझी मनापासूनची इच्छ आहे, असं मोदी मला म्हणाले होते.
त्यावर मी त्यांना माझी भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रीय प्रश्न आले आणि त्यावर चर्चा करण्यासाठी विरोधकांना निमंत्रित केलं तर तिथे विरोधाला विरोध करणारी भूमिका माझ्याकडून कधी घेतली जाणार नाही. राष्ट्रीय प्रश्न सोडवण्यासाठी पॉझिटिव्ह भूमिका माझ्याकडून घेतली जाईल. त्यामुळे त्याची तुम्ही चिंता करू नका. पण आपण एकत्र येऊन काम करावं हा तुमचा आग्रह आहे, तर ते मला शक्य नाही. मी एक छोटा पक्ष चालवतो. त्या पक्षाच्या विचाराचे लोक देशात आहेत. महाराष्ट्रात अधिक आहेत. त्या सर्वांना मी एक दिशा दिली आहे. त्या दिशेच्या बाहेर मी जाऊ शकत नाही. हे मला शक्य नाही, असं मी मोदींना सांगितलं होतं, असं पवार म्हणाले होते.
शरद पवार यांनी मोदींची भेट घेतली. राज्यात काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. पुढील वर्षी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका आहेत. या पाश्वभूमीवर मोदींनी पवारांना सोबत येण्याची पुन्हा ऑफर दिली का? अशी चर्चा आहे. विरोधकांकडून पवारांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार करण्याची शक्यता आहे. त्याबाबतही मोदी-पवार भेटीत चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
शरद पवारांची मोदींसोबतची चर्चा केवळ प्रशासकीय आहे असं वाटत नाही. पीयुष गोयल पवारांना भेटले होते. त्यानंतर राजनाथ सिंह भेटले. त्यानंतर आता मोदी-पवार भेट म्हणजे याला राजकीय अंग आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत समन्वयाचा सर्वात मोठा दुवा शरद पवार आहेत. महाराष्ट्रातील 48 जागा आहेत लोकसभेच्या. त्यामुळे पवारांना महत्त्व आहे. त्या अनुषंगाने आतापासून तयारी असू शकते. महाराष्ट्रात उद्या महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच्या जागी भाजप रिप्लेस झाली तर आश्चर्य वाटायला नको. 2022 मध्ये पाच राज्यांच्या निकालाची वाट पाहण्याची गोष्ट करतात. महाराष्ट्रात वेगवान राजकीय घडामोडी घडत आहेत. नाना पटोले सातत्याने पवारांना लक्ष करत आहेत. त्यामुळे काँग्रेसरहीत आघाडी महाराष्ट्रात होऊ शकते का, त्यादृष्टीनेही याकडे पाहायला हवं, असं राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे यांनी सांगितलं.
पवार आणि मोदींची ही दुसरी भेट आहे. काल पीयुष गोयल त्यांना भेटले. गोयल महाराष्ट्रातून राज्यसभेवर गेले आहेत. शिवाय पवार हे राज्यसभेतील सर्वात ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे ते पवारांना भेटले. तर राजनाथ सिंह यांनी संरक्षणाच्या मुद्दयावर माजी संरक्षण मंत्र्यांशी चर्चा केली. त्यात पवारही होते. परंतु, पण राज्यातील वातावरण पाहता आज पवार मोदींची भेट झाल्याने त्याला राजकीय हवा मिळणं साहजिकच आहे. पवार हे मातब्बर आणि मुरब्बी नेते आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, असं राजकीय पत्रकार संजय मिस्किन यांनी सांगितलं.
संसदेचं अधिवेशन आहे. त्या पार्श्वभूमीवर पवार आणि मोदींच्या भेटीकडे पाहिलं पाहिजे. प्रत्येक भेटीतून राजकीय अर्थ काढला तर त्यातून कोणतीही गोष्ट बाहेर येणार नाही. आज पवार भेटले. उद्या सेनेचे लोकंही मोदींना भेटतील. विविध पक्षाचे नेतेही मोदींना भेटतात. अधिवेशन आहे. त्यामुळे त्याचे राजकीय अर्थ लावायचे का?, असा सवाल ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक विजय चोरमारे यांनी केला. ही अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरील भेट असेल. सहकार खातं निर्माण झालं, त्याचं फंक्शनिंग कसं असावं यावर या भेटीत चर्चा झाली असावी. राजकीय चर्चेच्या पलिकडे अशा भेटीकडे पाहिलं पाहिजे. केंद्रीय यंत्रणेचा मुद्दाही या भेटीत आला असेल. सहकार खातं, केंद्रीय यंत्रणांची महाराष्ट्रातील कारवाई आणि लोकसभेचं अधिवेशन या पार्श्वभूमीवर ही बैठक असेल असं सांगतानाच मागच्या वेळी मोदींनी पवारांना एकत्र काम करण्याची ऑफर दिली होती. त्यावेळी त्यांनी प्रतिसाद दिला नव्हता. त्यामुळे या भेटीत या विषयावर चर्चा झाली असेल असं वाटत नाही, असंही चोरमारे यांनी स्पष्ट केलं.