कोरोनाबरोबरच युद्ध पुन्हा सुरू झालंय, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुढीपाडव्याच्या निमित्तानं जनतेला संबोधित करत आहेत. यावेळी कोरोनानं राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीची विदारकता ते सांगत आहेत. मधल्या काळात हे युद्ध आपण जिंकत आलेलो असल्याचं वाटत होतं. त्या युद्धाला पुन्हा एकदा सुरुवात झालीय. फार भयानक पद्धतीने ही रुग्णवाढ झालेली आहे. आजचा रुग्णांचा आकडा हा सर्वात उच्चांक गाठणारा आकडा आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय.
राज्यात 144 कलम लागू करण्यात आला असून, पुढील 15 दिवस संचारबंदी राहणार आहे. अनावश्यक येण-जाणं पूर्णपणे बंद करण्यात आलेय. अत्यावश्यक काम नसेल तर घराबाहेर पडू देणार नाही. सर्व आस्थापना, सार्वजनिक ठिकाणे बंद राहतील. सकाळी 7 ते रात्री 8 अत्यावश्यक सेवा, सुविधा सुरु राहतील, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. बस, लोकल सेवांसह अत्यावश्यक सेवांसाठी सार्वजनिक वाहतूक सुरु राहणार आहे. रुग्णालय, वैद्यकीय सेवा, वाहतूक सप्लाय चेन, लस उत्पादक आणि वाहतूक करणारे, मास्क, जंतूनाशक उत्पादक आणि वितरक, जनावरांचे दवाखाने, बस, ऑटो, राजनैतिक कार्यालये, पावसाळी कामे सुरु राहतील, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय.
जवळपास 60 हजार 212 एवढे कोविड पॉझिटिव्ह रुग्ण आपल्या राज्यात नोंदवले गेलेत. गेल्या वर्षी जेव्हा कोविडनं देशात किंबहुना राज्यात पहिलं पाऊल टाकलं. तेव्हाच्या आरोग्य सुविधांची मी वेळोवेळी कल्पना दिलेली आहे. कोविडची चाचणी करणारी लॅब आपल्याकडे एक किंवा दोनच होत्या. आज सर्व मिळून 523 चाचणी केंद्र राज्यात आहेत, अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिलीय.
मधल्याकाळात एमपीएससी, दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या, कोव्हिडची लाट कमी झाली की, ती लाट पुढे घेऊ शकतो. पण आपली जी परीक्षा आहे, त्यावर आपल्याला उत्तीर्ण व्हावंच लागेल. ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. मी मुद्दाम आपल्याला सांगतोय. मी सगळ्या घटकांशी बोलतोय. साहजिकच मतमतांतर असू शकतात. पण किती काळ चर्चा करायचं. हे आता परवडणारं नाही. कारण आता हा जो वेळ निघून गेला तर मदतीला कोणही येणार नाही. राज्यात दोन बाराशे मेट्रीक टेनचं उत्पादन करतो. हा संपूर्ण ऑक्सिजन फक्त कोरोना रुग्णांसाठी वापरतो आहोत, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेत.
बेड्स मिळत नाही आहेत, ऑक्सिजन कमी पडत आहे. रेमडेसिव्हीर औषधांची प्रचंड मागणी वाढली आहे. या औषधांची मधल्याकाळात मागणी घटली आणि अचानक मागणी वाढली. मागणी कमी झाल्याने कंपन्यांवरीलही दबाव वाढला. औषधे तयार व्हायला एक-दोन आठवडा लागतो. आता पुन्हा हा पुरवठा सुरु केला आहेत. आपण पुरवठा कमी होऊ देणार नाही. केंद्राकडे आपण विनंती केली आहे. पंतप्रधान मोदी यांच्यासोबत चर्चा झाली. पंतप्रधानांकडे सविस्तर माहिती जाते. आपण पारदर्शकतेने सर्व गोष्टींना तोंड देत आहोत. आताची परिस्थिती बघता येत्या काही काळात ऑक्सिजनची गरज लागणार आहे, अशी विनंती केली आहे.
आम्हाला इतर राज्यातून ऑक्सिजन आणण्यासाठी परवानगी द्या, अशी विनंती केली. पंतप्रधानांनी ईशान्य राज्यांतून ऑक्सिजन आणण्यास मंजुरी दिली आहे. ही राज्य हजारो किमी दूर आहेत. आपल्याला सुरळीत पुरवठा हवा आहे. त्यासाठी पंतप्रधान यांच्याकडे विनंती करतोय. हे ऑक्सिजन रस्त्याने आणेपर्यंत फार विचित्र परिस्थिती होऊ शकतो. त्यामुळे लष्करी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार हवाई मार्गाने आम्हाला ऑक्सिजन पुरवठा करा. कारण रस्ते मार्गाने ते शक्य नाही.
गेल्यावर्षी केवळ आपल्या संयम आणि सहकार्यामुळे आपण कितीतरी पटीने लाट थोपवली होती. आपण कोरोनावर नियंत्रण मिळवून दाखवलं आहे. गेल्यावेळा जेवढा अंदाज होता तेवढी संख्या वाढली नव्हती. मात्र, आता तेवढे रुग्ण वाढत आहेत. ही रुग्णवाढ भयावह आणि भीतिदायक आहे. ऑक्सिजन, रुग्णशय्येची कमतरता जाणवत आहे. आपण पुन्हा एकदा आरोग्य व्यवस्था वाढवतो आहे. पण हे एकतर्फी झालेय. आरोग्य सुविधा वाढवल्यानंतर प्रत्यक्ष उपचार वाढवण्यासाठी डॉक्टर लागतील. आता जे नवीन डॉक्टर पास झाले आहेत, त्यांना आवाहन करतोय. तसेच निवृत्त डॉक्टर, परिचारिका तुम्हीसुद्धा लढण्यासाठी पुढे या. सर्व सेवाभावी संस्था व्यक्ती यांनी पुढे या. तु्म्ही जे जे करु शकाल त्यासाठी पुढे या, असंही उद्धव ठाकरेंनी आवाहन केलंय.
मी सर्व राजकीय पक्षांना विनंती करतो की, उणीदुणी काढत बसू नका. आता जर उणीदुणी काढत बसलो तर महाराष्ट्र आपल्याला माफ करणार नाही. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही विनंती केली. देशातील सर्व प्रमुख राजकीय नेत्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगवर बैठक घेऊन सर्वांना सांगा, आता राजकारण बाजूला ठेवा. हे फार मोठं संकट आहे. आपण एकत्र येऊन लढलो नाही, आपण याला साथ म्हणतो त्याविरोधात साथ येऊन लढलो पाहिजे. आपण जे निर्बंध लावतो आहे, ते केवळ आपल्यासाठी आहे. मी महिन्याभरापासून संकेत दिले आहेत, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेत.
आता कडक पावलं उचलण्याची वेळ आले आहेत. पण मी लगेच लॉकडाऊन म्हणत नाही. आपल्याला रोजी रोटी महत्त्वाची आहे. पण रोजी रोटी बरोबरच जीव वाचवणं महत्त्वाचं आहे. तो वाचवण्यासाठी निर्णय घेत आहोत. उद्या (14 एप्रिल) संध्याकाळी आठ वाजल्यापासून निर्बंध सुरु होतील. फक्त पंढरपूर येथे निवडणूक असल्याने दोन-चार दिवस तिथे निर्बंध नसतील. पण मतदानानंतर तिथे निर्बंध लागू राहतील. यासाठी सहकार्य करा, अशी मी विनंती करतो, असंही उद्धव ठाकरेंनी अधोरेखित केलंय.
राज्य सरकार म्हणून अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना एक महिन्यासाठी प्रत्येकी तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ देणार आहोत. या योजनेमध्ये सात कोटी नागरिकांचा समावेश आहे. दहा रुपयांची शिवभोजन थाळी पाच रुपयांवर आणली होती. पुढचे काही दिवस शिवभोजन थाळी मोफत देणार आहोत. संजय गांधी निराधार, श्रावळ बाळ योजना, इंदिरा गांधी निवृत्ती योजना अशा पेन्शन लाभार्थ्यांना 1 हजार रुपये आगाऊ देणार आहोत. यामध्ये 35 लाख लोकांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्य इमारत कामगार कल्याण मंडळ आहे. त्यात 12 लाख लाभार्थी आहेत. त्यांना 1500 रुपये देणार आहोत. नोंदणीकृत घरेलू कामगार यांना निधी देणार आहोत. अधिकृत फेरीवाले यांना एका वेळेचे 1500 रुपये देत आहोत. यांची संख्या 5 लाख आहे. रिक्षा चालकांना 1500 रुपये देत आहोत. यांची संख्या 12 लाख आहे. आदिवासी कुटुंबाना प्रति कुटुंब 2000 रुपये देत आहोत. त्यांची संख्या 12 लाख आहे. कोविड संदर्भातील उभारणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना अतिरिक्त निधी 3300 कोटी कोविडसाठी बाजूला काढून ठेवत आहोत. हे सगळ करण्यासाठी पाच हजार चारशे कोटी रुपये निधी बाजूला काढून ठेवत आहे, अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिलीय.