Monday, August 11, 2025
HomeMain Newsमुख्यमंत्रीपदी पुन्हा फडणवीसांना बसवा; आरक्षण देण्यास मी भाग पाडतो – उदयनराजे

मुख्यमंत्रीपदी पुन्हा फडणवीसांना बसवा; आरक्षण देण्यास मी भाग पाडतो – उदयनराजे

साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, मराठा आरक्षणासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करून काही उपयोग नाही. त्याऐवजी देवेंद्र फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्री बनवा, त्यांना मी मराठा समाजाला आरक्षण देण्यास भाग पाडतो. तसेच मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदी खासदार छत्रपती संभाजीराजे यांची नेमणूक करा, एका दिवसात आम्ही प्रश्न सोडवतो, असेही उदयनराजे यांनी म्हटले आहे.

ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे आपल्याच वयाचे असून आरक्षण त्यांनी टिकवले आणि त्यांनाच आता नाव ठेवली जातात. आता सत्तेत आहात ना, मराठा आरक्षणाला पुढे न्या. सत्तेत राहायचे आहे ना, महाराष्ट्र आहे, मराठा समाज निर्णायक जात आहे. उमेदवार कोणत्याही जातीतला असू देत, त्याच्याकडून मराठा आरक्षणाचा प्रश्न तडीला लावणार, असे आश्वासन घ्या, असेही उदयनराजे यांनी म्हटले आहे.

खासदार उदयनराजे म्हणाले, मराठा आरक्षणासाठी शरद पवारांशी चर्चा करुन काही उपयोग होणार नाही. त्यांनी आधीच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी. मार्ग निघणार असेल तर चर्चा करावी. सत्र न्यायालयातही तारीख देतात. मग सर्वोच्च न्यायालयाने तारीख का दिली नाही. राज्य सरकारचा वकील सुनावणीच्या दिवशी हजर राहत नसल्याचा आरोपही उदयनराजे यांनी यावेळी केला. जसे इतरांना आरक्षण मिळाले तसे मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच पाहिजे, असे उदयनराजे म्हणाले.

सगळेच मराठा समाजाचे आरक्षण स्थगित व्हायला जबाबदार आहेत. मी कुणाचे नाव घेऊन कुणाला मोठे करणार नाही. ही लोक मोठी नाहीत, केवळ वयाने मोठी आहेत, अशा शब्दांत खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना टोला लगावला. त्यांना लोकांनी मान सन्मान दिला, निवडून दिले. वेळ आली तर हीच लोक खाली खेचतात. लोक त्यांना रस्त्यावर येऊ देणार नाही, घरात जाऊन जाब विचारतील, असेही उदयनराजे यावेळी म्हणाले. मराठ्यांचा उद्रेक घडला, तर हेच लोक त्याला जबाबदार असतील, असा इशारा देखील यावेळी त्यांनी दिला.

खासदार उदयनराजे म्हणाले की, मला समजत नाही, की शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे. सर्वधर्म समभावाचा विचार सांगायचा आणि अनेक वर्षांपासून एखाद्या समाजाला दाबण्याचे काम झाले आहे. मराठा म्हणून मी जन्माला आलो असलो तरी मराठा म्हणून बोलत नाही. शिवाजी महाराजांच्या विचारांचा आधार घेऊन, प्रत्येक समाजाला न्याय मिळायला हवा, या भूमिकेतून आज मुद्दे मांडणार आहे. मराठा समाजाचा अंत आता आणखी किती दिवस पाहणार आहात. मंडल आयोगावेळी मराठा समाजाचा विचारा का केला नाही? असा सवाल देखील उदयनराजेंनी उपस्थित केला.

आता कुबट वास यायला लागला आहे. छत्रपतींचे नाव घ्यायचे आणि राजकीय दृष्टिकोन ठेवायचा आणि एखाद्या समाजाला दाबायच काम केले जात आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न आधीच्या पीढीतील लोकांनी जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवल्याचे उदयनराजे म्हणाले. प्रत्येक निवडणुकीच्या वेळी केवळ होणार, झाले, असे आश्वासन दिले जाते. थोडीतरी जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा. प्रश्न सोडवता येत नसेल तर राजीनामा द्या आणि घरी बसा, अशा शब्दात त्यांनी आरोप केला आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments