विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब यांचा विजय झाला. या विजयानंतर अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत आपली पहिली प्रतिक्रिया दिली. “मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या या निवडणुकीत मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून विजयी झालोय. माझे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आमचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी माझ्या विजयासाठी आणि माझ्या असंख्य शिवसैनिकांनी मी निवडून यावं म्हणून अहोरात्र प्रयत्न केले. हा विजय माझ्या सर्व शिवसैनिकांचा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आहे. हा विजय मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी अर्पण करत आहे. ज्या निष्ठेने सर्व मविआचे घटकपक्ष आणि शिवसैनिक लढले त्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद आमच्या सर्वांवर अशाचप्रकारे रहावा, अशी मी प्रार्थना करतो”, असं अनिल परब म्हणाले.
“आम्ही नेहमी घोषणा देतो, मुंबई आहे आमच्या साहेबांची, नाही कुणाच्या बापाची. ही घोषणा आम्ही सत्य करुन दाखवली आहे. शिवसेना पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ असो, मुंबईत शिवसेनाच आहे. ती सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे. शिक्षक मतदारसंघामध्येही विजयाच्या आम्ही अंतिम टप्प्यावर आहेत. मुंबईतील शिक्षक हे शिवसेनेसोबत आहेत हे सिद्ध झालं आहे. अधिकृत आकडेवारी सांगायची झाली तर मला 44 हजार 700 मते मिळाली आहेत. मी प्रतिस्पर्धीवर 26 हजार 26 मतांनी मात केली आहे. ही पदवीधर मतदारसंघामधील आजवरचा उच्चांक आहे”, असा दावा अनिल परब यांनी केला.