Sunday, March 1, 2026
Homeमहाराष्ट्रमुंबईतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या हातात आता दिसणार भगवतगीता

मुंबईतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या हातात आता दिसणार भगवतगीता

मुंबईतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आता भगवतगीतेचाही अभ्यास करावा लागणार आहे. कारण भगवतगीतेचे वाटप मुंबईतील महाविद्यालयांमध्ये करण्याची सूचना देण्यात आली असून भगवतगीता फक्त अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये वाटली जाणार आहे. यासंबंधी उच्च शिक्षण विभागाने परिपत्रक जारी केले आहे. दरम्यान या निर्णयामुळे नवा वाद निर्माण झाला असून विरोधकांनी टीकेला सुरुवात केली आहे.

परिपत्रकात सांगण्यात आल्यानुसार, भगवतगीतेचे वाटप नॅक मुल्यांकन झालेल्या अ/अ+ श्रेणी प्राप्त मुंबई आणि मुंबई उपनगरांमधील १०० महाविद्यालयांमध्ये केले जाणार आहे. प्राचार्यांना यासाठी भगवतगीतेच्या १०० संचाचे वाटप करण्याचा आदेश देण्यात आला आहे.

दरम्यान विद्यार्थी संघटनांसोबत विरोधकांनीही सरकारच्या या निर्णयावर टीकेला सुरुवात केली आहे. महाविद्यालयात धर्मनिरपेक्षता असायला हवी असे सांगत निर्णयावर फेरविचार करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. तर दुसरीकडे विरोधकांनी महाविद्यालयात धार्मिक गोष्टी आणण्याची काही गरज नसल्याचे म्हटले आहे.

आमचा भगवतगीतेला विरोध नाही, पण ती महाविद्यालयात आणू नये असे आमचे म्हणणे असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी म्हटले आहे. सतत बातम्यात राहण्याचा आपला प्रयत्न विनोद तावडे यांनी थांबवावा असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

या निर्णयावर कपिल पाटील यांनी देखील टीका करत संघीकरण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे म्हटले आहे. भाजपाची सत्ता जिथे जिथे आहे तिथे हा प्रयत्न होत आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात होत नव्हते, पण आता येथेही सुरु होत आहे. जर धर्माचा प्रसार करायचाच असेल तर मग सर्व धर्मांचे ग्रंथ वाटले पाहिजेत, असे कपिल पाटील यांनी म्हटले आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments