Friday, August 8, 2025
Homeमहाराष्ट्रमुंबईच्या प्रवेशद्वारावर असलेले 5 टोलनाके कुठले? किती आकारला जात होता टोल?

मुंबईच्या प्रवेशद्वारावर असलेले 5 टोलनाके कुठले? किती आकारला जात होता टोल?

राज्य सरकारची सोमवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडलीय. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत. विशेष म्हणजे राज्यात मागील कित्येक वर्षांपासून टोलवसुलीचा प्रश्न रखडला होता, तसेच त्यावरून अनेक आंदोलनं झालीत. परंतु आता टोलमाफीचा निर्णय घेत महायुती सरकारनं सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय. मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोलनाक्यावर हलक्या वाहनांना संपूर्ण टोलमाफीचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने सोमवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलाय. त्यामुळं मुंबईत प्रवेश करणाऱ्या प्रवाशांना आणि वाहतूकदारांना दिलासा मिळालाय.
वाशी टोलनाका
ऐरोली टोलनाका
मुलुंड-LBS टोलनाका
आनंदनगर (मुलुंड) टोलनाका
दहिसर टोलनाका

महायुती सरकारच्या टोलमाफीच्या निर्णयामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला असून, मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना 45 रुपयांपासून 75 रुपयांपर्यंत टोल आकारला जात होता. मात्र या निर्णयामुळं प्रवाशांचे आणि वाहतूकदारांचे 45 ते 75 रुपये आता वाचणार आहेत. दरम्यान, मोटार वाहन कायदा 1988 नुसार हलक्या मोटार वाहनांमध्ये कार, दुचाकी, छोटे ट्रक, डिलिव्हरी व्हॅन, जीप, वॅन, टॅक्सी आदी वाहनांना समावेश होतो. मुंबईत रोज 3.5 लाख वाहनं ये-जा करतात. यामध्ये 70 हजार जड वाहनं आणि 2.80 लाख हलकी वाहनांचा समावेश आहे. ही टोलमाफी 2026 पर्यंत असणार आहे.महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी अनधिकृत टोलनाके आहेत. या टोलनाक्यावरून दररोज लाखो रुपयांची लूट प्रवाशांकडून होत आहे. हे टोलनाके कुणाचे? आणि हा पैसा नेमका जातो कुठे? हे काही माहीत नाही. राज्यातील टोलनाके बंद व्हावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं अनेक आंदोलनं केलीत. आमच्या कित्येक कार्यकर्त्यांनी पोलिसांचा मार खावा लागला. आमच्या आंदोलनामुळे राज्यातील 60 ते 65 टोलनाके बंद झाले आणि आता मुंबईत येणाऱ्या पाच टोलनाक्यावर संपूर्णतः टोलमाफीचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा असल्याची प्रतिक्रिया मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी “ईटीव्ही भारत”शी बोलताना दिलीय. आम्ही कित्येक वर्षांपासून टोलच्या प्रश्नावरून आंदोलन करीत होतो. हा आमचा लढा होता…, या लढ्याला आता यश आलंय. लोकांचे तासनतास रांगेत उभे राहून इंधन वाया जायचे. पण या निर्णयामुळं इंधन आणि पैसाही वाचेल. इंधन वाचल्यामुळं एक प्रकारे देशाचे जे नुकसान होत होते, तेही वाचेल. सरकारचा हा निर्णय मुंबईकरांसाठी आणि मुंबईत येण्यासाठी अत्यंत दिलासादायक आहे. म्हणून मी या सरकारचे आभार मानतो…, राजसाहेब ठाकरे यांचे आभार मानतो. कारण त्यांनीच पहिल्यांदा या प्रश्नाला हात घातला होता आणि आता त्याचे यश आम्ही पाहतोय, असंही बाळ नांदगावकर यांनी म्हटलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments