नवी दिल्ली : २८ मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. २० मे रोजी मान्सून अंदमान आणि निकोबार बेटावर पोहोचेल. यानंतर तो २४ मे रोजी श्रीलंकेत दाखल होईल आणि त्यानंतर बंगालच्या उपसागरावरुन मान्सूनचा प्रवास सुरू होईल, असा अंदाज स्कायमेटने व्यक्त केला आहे.
केरळमध्ये मान्सून २८ मे रोजी दाखल होईल, अशी माहिती स्कायमेटचे उपाध्यक्ष महेश पलावत यांनी दिली. अपेक्षेपेक्षा चार दिवस आधीच मान्सून केरळमध्ये दाखल होईल, असेही त्यांनी सांगितले. केरळमध्ये मान्सून साधारणत: एक जूनला दाखल होतो. मात्र यंदा तो चार दिवस आधीच केरळमध्ये पोहोचेल, अशी शक्यता स्कायमेटने वर्तवली. यंदाचा मान्सून १०० टक्के सामान्य राहणार असल्याचा अंदाज ४ एप्रिल रोजी स्कायमेटने व्यक्त केला होता.
पाऊस सामान्य राहील, अशी शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. यंदा पाऊसमान कमी राहण्याची शक्यता कमीच असल्याचे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.