समाजाच्या संवेदना बोथट झाल्या आहेत असे आपण गेली काही वर्षे म्हणत होतो. पण आता त्या बोथट राहिलेल्या नाहीत, तर पूर्णपणे संपल्या आहेत, याची खात्रीच होत चालली आहे. याचे सर्वात विदारक उदाहरण म्हणजे जागतिक कीर्तीचे पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांच्या अंत्यसंस्काराला केवळ ४०–५० माणसे उपस्थित राहिली ही घटना.
ही केवळ उपस्थितीची संख्या नाही;
ही आपल्या सामाजिक प्राधान्यांची, मूल्यव्यवस्थेची आणि बौद्धिक दारिद्र्याची आकडेवारी आहे.
कारण वास्तव असं आहे की समाजाला माधव गाडगीळ नको आहेत.
समाजाला हवेत ते भुरटे नगरसेवक, त्यांची बॅनरबाजी, त्यांचे शक्तिप्रदर्शन आणि त्यांच्या निवडणुका.
समाजाला हवेत ते उन्माद, तमाशा, भीड आणि झुंडी.
म्हणूनच मनात कुठेतरी क्रूरपणे वाटतं —
बरे झाले गाडगीळ गेले.
कारण माधव गाडगीळ कळण्याइतकी आपली लायकीच उरलेली नाही.
माधव गाडगीळ हे केवळ एक व्यक्ती नव्हते.
ते जागतिक दर्जाचे पर्यावरणतज्ज्ञ, विचारवंत, शास्त्रज्ञ आणि समाजाला आरसा दाखवणारे निर्भीड बुद्धिजीवी होते.
पश्चिम घाटाच्या संवर्धनासाठी त्यांनी आयुष्य झोकून दिले.
विकासाच्या नावाखाली निसर्गाच्या होणाऱ्या विध्वंसाला त्यांनी ठाम विरोध केला.
याच निर्भीडपणामुळे ते सत्ताधाऱ्यांना, ठेकेदारांना आणि स्वार्थी राजकारण्यांना कधीच प्रिय नव्हते.
त्यांच्या निधनाची दखल संयुक्त राष्ट्र संघाने घेतली.
त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण हे देशातील सर्वोच्च सन्मान मिळाले.
परंतु त्यांच्या अंत्ययात्रेला मात्र समाजाची पाठ फिरलेली दिसली.
याउलट समाज कशासाठी जमतो, हे पाहिलं तर चित्र अधिक विदारक होतं —
माणसं गुंडांना डोक्यावर घेत आहेत.
पैसे, दारू, मटणासाठी आपली मतं विकत आहेत.
बलात्कारी माणसाला हार घालून मिरवणूक काढून स्वागत केलं जातं.
मेडिकल कॉलेज बंद केल्याबद्दल जल्लोष होतो.
क्रिकेटच्या उन्मादात बंगळुरूमध्ये विराट कोहलीच्या विश्वचषक रॅलीत ११ माणसं चेंगरून मरतात, तरीही गर्दी कमी होत नाही.
मुंबईत टी–२० विजेत्या खेळाडूंच्या स्वागताला संपूर्ण शहर तुंबून जातं.
शाहरुख खानच्या घराबाहेर रोज प्रचंड गर्दी उसळते.
भ्रष्ट नेत्याची एक झलक मिळावी म्हणून लोक एकमेकांच्या उरावर पडतात.
जमिनी, कारखाने, नद्या, जंगलं लुटणारे लुटारू ‘महान’ ठरतात.
सिनेमातल्या फुटकळ हिरो–हिरोईनसाठी रस्ते अडवले जातात.
महाकुंभमेळ्यात, देवीच्या यात्रांमध्ये, काळुबाईच्या उत्सवात लोक चेंगरून मरतात.
बुवा–बाबांच्या कथावाचनात भक्त चिरडले जातात.
नुसत्या डीजेवर नाचण्यासाठी पाचशे लोक गोळा होतात.
दहीहंडी फोडण्यासाठी पन्नास हजारांची गर्दी जमत असते.
पण
माधव गाडगीळांच्या अंत्यसंस्कारासाठी नाही.
ही तुलना वेदनादायक आहे, पण आवश्यक आहे.
कारण यातूनच आपली सामाजिक मानसिकता उघडी पडते.
इतक्या मोठ्या व्यक्तीसाठी —
नेतेमंडळींना वेळ नाही.
जिल्हाधिकाऱ्यांना वेळ नाही.
प्रशासनबाबूंना वेळ नाही.
पद्मभूषण पुरस्कारविजेत्या शास्त्रज्ञाला शेवटचा निरोप द्यायला
या व्यवस्थेकडे वेळ नाही, इच्छा नाही, संवेदना नाहीत.
ही उदासीनता नाही;
हा नैतिक दिवाळखोरीचा कळस आहे.
आजचा समाज विचारवंतांपेक्षा शक्तीपूजेला अधिक मानतो.
बुद्धीपेक्षा उन्मादाला,
तर्कापेक्षा अंधश्रद्धेला,
विवेकापेक्षा तमाशाला जास्त महत्त्व देतो.
म्हणूनच शास्त्रज्ञ, पर्यावरणतज्ज्ञ, साहित्यिक, कलाकार, बुद्धीप्रामाण्यवादी हे समाजाच्या कडेला ढकलले जातात.
ते जिवंत असताना दुर्लक्षित राहतात आणि मरणानंतरही एकटेच.
प्रश्न खूप गंभीर आहे —
समाज म्हणून आपण कुठं चाललो आहोत?
कुणाचं उदात्तीकरण करतोय?
आपण कुणाला आदर्श मानतोय?
पुणं संपलंय का?
की पुण्याची विचारपरंपरा संपवली जात आहे?
ज्या समाजाला शास्त्रज्ञांची किंमत उरलेली नाही,
विचारवंत नको आहेत,
तर्क नको आहे,
पर्यावरण रक्षण नको आहे —
तो समाज वरून कितीही चकचकीत, आधुनिक, झगमगता दिसला
तरी आतून सडलेला, नासलेला आणि पोकळ असतो.
माधव गाडगीळ गेले, ही दु:खद गोष्ट आहे.
पण त्याहून मोठी शोकांतिका म्हणजे —
आपण त्यांना ओळखू न शकणारा समाज बनलो आहोत.
हीच खरी शोकसभा आहे.



