सचिन वाझे प्रकरणामध्ये बदली करण्यात आलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परबमबीर सिंग यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख वसुलीसाठी टार्गेट देत होते, असा आरोप केला.
गृह रक्षक दलाचे महासंचालक असणारे परमवीर सिंग यांनी आपली नाराजी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कळवली असून, हेच पत्र त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनाही पाठवले आहे. पत्रामध्ये त्यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यामध्ये “गृहमंत्र्यांनी सचिन वाझे यांना महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट दिलं होतं”, असा आरोप केला आहे.
परमबीर सिंग यांनी लिहिलेलया पत्रामध्ये अनेक मुद्दे परमवीर सिंग यांनी मांडले आहेत. “गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये सचिन वाझे यांना अनेकदा त्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या ज्ञानेश्वर बंगल्यावर बोलावलं होतं. यावेळी त्यांनी सचिन वाझे यांना फंड जमा करण्यासाठी मदत करण्याचे आदेश दिले होते. साधारणपणे फेब्रुवारीमध्ये आणि त्यानंतर सचिन वाझेंना गृहमंत्र्यांनी त्यांच्या घरी बोलावलं होतं. त्यावेळी गृहमंत्र्यांचे पर्सनल सेक्रेटरी पाळंदे आणि इतर काही कर्मचारी देखील तिथे उपस्थित होते. गृहमंत्र्यांनी वाझेंना सांगितलं की त्यांना महिन्याला १०० कोटी रुपये जमा करण्याचं टार्गेट होतं. हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी मुंबईत साधारणपणे १७५० बार, रेस्टॉरंट आणि इतर आस्थापनं आहेत. जर त्या प्रत्येकाकडून २ ते ३ लाख रुपये जमा झाले, तर महिन्याला ४० ते ५० कोटी जमा होतील. उरलेले पैसे इतर मार्गांनी जमा करता येतील, असं गृहमंत्र्यांनी वाझेंना सांगितलं होतं”, असा गंभीर आरोप परमवीर सिंग यांनी केला आहे.
“सचिन वाझेंनी त्याच दिवशी माझ्या कार्यालयात येऊन या सगळ्या प्रकाराबद्दल मला माहिती दिली. ते ऐकून मला धक्काच बसला,” असे परमवीर सिंग यांनी म्हंटले आहे.
“या प्रकारानंतर काही दिवसांनंतर सोशल सर्व्हिस ब्रँचचे एसीपी संजय पाटील यांना देखील गृहमंत्र्यांनी चर्चेसाठी घरी बोलावलं होतं. मुंबईतल्या हुक्का पार्लरविषयी चर्चा होती. या बैठकीला पाळंदे आणि इतर अधिकारी होते. दोन दिवसांनी पुन्हा पाटील यांनी डीसीपी भुजबळ यांच्यासोबत गृहमंत्र्यांच्या बंगल्यावर बोलावले गेले. हे दोघे गृहमंत्र्यांच्या केबिनबाहेर वाट पहात असताना पाळंदे आत गेले आणि बाहेर आल्यानंतर त्यांनी पाटील आणि भुजबळ यांना बाजूला नेऊन माहिती दिली. मुंबईतल्या १७५० बार, रेस्टॉरंट आणि इतर आस्थापनांमधून महिन्याला ४० ते ५० कोटींच्या वसुलीचं टार्गेट गृहमंत्र्यांनी दिल्याचे पाळंदे यांनी दोघांना सांगितले. मला गृहमंत्र्यांनी केलेल्या मागणीविषयी एसीपी पाटील यांनी सांगितले. १६ मार्चला पाटील यांना मी मेसेजवर विचारल्यानंतर त्यांनी ४ मार्चला या सगळ्या घडामोडी घडल्याचे मला सांगितले, असे या पत्रात परमवीर सिंग यांनी म्हंटले आहे. एसीपी पाटील यांच्याबरोबर झालेल्या मेसेजेसची प्रत त्यांनी पत्रासोबत जोडली आहे.
दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येप्रकरणामध्ये चुकीची केस नोंदवायला भाग पाडल्याचेही सिंग यांनी पत्रात म्हंटले आहे. या सगळ्या गोष्टींची माहिती मुख्यमंत्री, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आली होती, असेही पत्रात म्हंटले आहे.
हे पत्र माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले असून, सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. “कायदेशीर कारवाईपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी परमबीर सिंग यांनी हा आरोप केला”, असे ट्वीट अनिल देशमुख यांनी केले आहे.
देशमुख यांनी स्वतः राजीनामा द्यावा किंवा मुख्यमंत्र्यांनी देशमुख यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांकडून अथवा न्यायालयाच्या नियंत्रणाखाली या सगळ्या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.