भीमा कोरेगाव हिंसाचार आणि अर्बन नक्षलवाद्याचा संबंध असल्याच्या आरोपाप्रकरणी डॉ. आनंद तेलतुंबडे यांना करण्यात आलेली अटक ही पुणे सत्र विशेष न्यायालयाने आज (२ फेब्रुवारी) अवैध ठरवली आहे. तसेच तेलतुंबडे यांना तातडीने सोडण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. न्यायालयाच्या या निर्णयाने पुणे पोलिसांना मोठा धक्का बसला असल्याचे मानले जाते. मुंबईतून आज सकाळी तेलतुंबडे यांना (२ फेब्रुवारी) अटक करण्यात आली आहे.
पुणे जिल्हा विशेष न्यायालयाने शुक्रवारी (१ फेब्रुवारी) आनंद तेलतुंबडेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. विशेष न्यायाधीश के.डी. वदने यांनी आपल्या आदेशात ‘आरोपीची गुन्हातील सहभागाबद्दल तपास यंत्रणेने सादर केलेली कागदपत्रे पुरेशी आहेत. या प्रकरणाचा तपास आता महत्वाच्या टप्यावर आला आहे.’ असे म्हटले होते. आज पुणे पोलिसांनी तेलतुंबडेंना मुंबईतून अटक केली. गेल्या महिण्यात सर्वोच्च न्यायालयाने तेलतुंबडेची पुणे पोलिसांनी दाखल केलेली एफआयआर रद्द करण्यासंदर्भातील याचिका फेटाळली होती.