अश्लील चित्रपटांची निर्मिती केल्याप्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याला मुंबई पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्यामुळे पॉर्नोग्राफी किंवा अश्लील चित्रपट, कंटेंट याविषयी लोकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. भारतात पॉर्नोग्राफी किंवा पॉर्नोग्राफिक कंटेंटच्या अनुषंगाने कठोर कायदे आहेत; पण मग भारतात अश्लील चित्रपट पाहणं हा गुन्हा ठरू शकतो का, यासह अनेक प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होत आहेत.
पॉर्नोग्राफीसंदर्भातले गुन्हे करणाऱ्यांवर माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत कारवाई केली जाते. भारतात पॉर्नोग्राफीवर पूर्णतः बंदी आहे. असं असतानाही काही वेबसाइट असा पॉर्नोग्राफिक कंटेंट दाखवतात; मात्र ते बेकायदेशीर आहे. पॉर्नोग्राफीविषयी भारतात असलेले कायदे, शिक्षेची तरतूद आणि लोकांच्या मनात असलेले विविध प्रश्न या अनुषंगाने माहिती देणारं वृत्त ‘टीव्ही नाइन हिंदी’ने दिलं आहे.
अनेक वेबसाइट्स दुसऱ्या देशांमध्ये रजिस्टर्ड असल्याने त्या भारतीय कायद्याच्या कक्षेबाहेर असतात. एखादी व्यक्ती आपल्या वैयक्तिक डिव्हाइसवर असा कन्टेंट बघत असेल तर तो गुन्हा ठरत नाही. एखादी व्यक्ती जबरदस्तीने अश्लील कन्टेंट तयार करत असेल तर तो गुन्हा ठरतो. तसंच एखाद्या व्यक्तीच्या परवानगीविना त्याला अश्लील कन्टेंट पाठवला जाणं हाही गुन्हा ठरतो. त्या व्यक्तीला तुरुंगाची हवा खावी लागू शकते. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचा अश्लील कन्टेंट एखादी व्यक्ती सेव्ह करून, साठवून ठेवत असेल तर तो गुन्हा आहे.
एखादी व्यक्ती आपला मोबाइल किंवा लॅपटॉपवर अशा प्रकारचा कन्टेंट एकट्याने पाहत असेल तर तो गुन्हा ठरत नाही; मात्र कायद्यानुसार चाइल्ड पॉर्नोग्राफी पाहणं अवैध आहे. तसंच तशा प्रकारचा कन्टेंट तयार करणं किंवा वितरित करणं हाही गुन्हा असून, त्यामुळे संबंधित व्यक्तीवर कारवाई होऊ शकते.
पॉर्नोग्राफीअंतर्गत येणाऱ्या प्रकरणांमध्ये आयटी अॅक्ट 2008चं कलम 67 (ए) आणि आयपीसी कलम 292, 293,294, 500, 506 आणि 509 नुसार शिक्षा ठोठावली जाते. गुन्हा किती गंभीर आहे हे पाहून 5 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 10 लाख रुपयांपर्यंत दंड अशी शिक्षा दिली जाते. दुसऱ्यांदा गुन्हा केल्यास सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली जाते, असं ‘टीव्ही 9’ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.
देशात अश्लील कन्टेंटचा समावेश असलेली मासिकं, नियतकालिकांची विक्री होते. परंतु, कायद्यानुसार, एखादा लेख लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी लिहिला गेला असेल तर तो अवैध ठरू शकत नाही. त्या व्यतिरिक्त असा कंटेंट देणारे सर्व लेख पॉर्नोग्राफीअंतर्गत येतात.