औरंजेबाच्या कैदेतून सुटून आल्यावर शाहूमहाराजांनी सातारच्या किल्ल्यावर आपल्या राज्याभिषेक करवून घेतला व सातारच्या किल्ल्यावरूनच त्यांनी राज्यकारभाराची सूत्रे हलवण्यास सुरुवात केली. अडचणीत सापडलेले मराठा साम्राज्य शाहूमहाराजांच्या समयसूचक धोरणांमुळे हळू हळू मोकळा श्वास घेऊ लागले. विखुरलेले एक एक मराठा सरदार एकत्र करून त्यांच्यात स्वराज्यची उर्मी नव्याने जागृत करत शाहूमहाराजांनी मराठा स्वराज्याला मराठा साम्रज्याचे स्वरूप देण्यास सुरुवात केली. मराठा साम्राज्याचा चोहूबाजूला जसाजसा विस्तार होऊ लागला तसातासा सातारच्या किल्ल्याचा परिसर प्रशासनच्या दृष्टीने कमी पडू लागला व त्यातूनच सातारा शहराच्या स्थापनेची कल्पना पुढे आली आणि शहराची मुहूर्तवेढ रोवत शाहूमहाराजांनी मराठा स्वराज्याच्या ७० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच स्वज्याची राजधानी डोंगरावरून जमिनीवर आणली.
सातारा शहराची अर्थात शाहुनगरीची रचना व त्यातील भागांची नवे शाहूमहाराजांच्या आमदनीची आठवण करून देतात. राजकीय महत्व संपले तरीही मराठा साम्राज्यही राजधानी म्हणून साताऱ्याचा अभिमान महाराष्ट्रीयांना आजही वाटतो. शाहुनगरची स्थापना १७२१ च्या सुमारास झाली. शाहूमहाराजांच्या दिनांक २८ मार्च १७२१ च्या पत्रात तातडीने वाडा बांधल्याचा उल्लेख आहे. शाहूमहाराजांच्या व पेशव्यांच्या भेटी होत त्या रोजनिशीत नोंदल्या आहेत त्यावरून शहर रचनेच्या कालावधीचा अंदाज लागतो. डिसेंबर १७२० च्या सुमारास श्रीमंत बाजीरावांनी शाहूमहाराजांची भेट सातारा किल्यावर घेतली. त्यानंतर सात -आठ महिन्यांच्या भेटी माची किल्ले सातारा येथे झालेल्या आहेत. त्यापुढे ऑगस्ट १७२१ ला शाहूनगर नजीक केल्ले सातारा येथे श्रीमंत बाजीरावांनी शाहूमहाराजांची भेट घेतली असा उल्लेख आहे. अर्थात १७२१ च्या सुमारास शाहूनगर स्थापना झाली.
शाहूनागरालच हल्ली सातारा असे म्हणतात. शाहूमहाराजांनी स्वतःकरीत दोन राजवाडे बांधले. यव्तेश्वरच्या डोंगरातून नळ बांधून पाणी आणले. जागोजागी हौद तलाव बांधले त्यांनी शाहुनगरच्या वैभवात जास्तीत जास्त भर घालण्याचे प्रयत्न केले.
शाहुनगरची रचना व प्रतिष्ठा शाहूमहाराजांच्या नजरेखाली पुष्कळ वाढली. व्यापार उद्योग वाढला. नवीन सावकार निर्माण झाले. सुखानंद,सुमेरगिरी,बन्सीपुरी अशा परदेशी सावकारांची वस्ती सुरु झाली. मराठ्यांचा बाह्यउद्योग पसरत गेला, त्याबरोबर उत्तरेकडचे हिंदी लोग , वकील, व्यापारी, हुन्नरी कलावंत अशी अनेक माणसे दक्षिणेत आल्यामुळे शाहुनगरातील दळणवळण वाढून नगराचे जीवनस्तर उंचावले. त्याच बरोबर शाहुनगरचे वैभवसुद्धा विस्तारले.
महाराष्ट्रातील पहिले नियोजनबद्ध शहर (प्लॅनड सिटी) वसवताना शाहूमहाराजांनी तख्ताचा वाडा, रंगमहाल, पीलखाना, अदालतवाडा, बेगम मस्जिद असा अनेक भव्यदिव्य इमारतींची उभारणी केली.
१) तख्ताचा वाडा : हल्ली जिथे शाहू उद्यान आहे तिथे शाहूमहाराजांचा वाडा होता. तिथेच त्यांचे सिंहासन होते. म्हणू त्याला तख्ताचा वाडा म्हणत. जवळच लागून असलेल्या विहिरीस तख्ताची विहीर म्हणत. सध्या एक तटबंदीची भिंत व वाड्याच्या भिंतीचा अवशेष अढळतो.
२) रंगमहाल: रंगमहाल हि वस्तू अदालतवाड्याच्या पूर्वेस सुमारे २०० मीटर अंतरावर आहे. मूळ इमारत ३० मीटर लांब व १५ मीटर रुंद असून तिला ४५ मीटर रुंदीची नवीन इमारत जोडून बांधली आहे. मूळ इमारत ३ माजली होती. शाहूमहाराजांच्या राण्यांचा राणीवसा येथे होता म्हणून या इमारतीस रंगमहाल असे नाव देण्यात आले. राजमाता येसूबाईसाहेब देखील याच वाड्यात राहत असत. १८७४ साली लागलेल्या आगीत संपूर्ण रंगमहाल बेचिराख झाला. सध्या या वाड्याचा अर्धा भाग कूपर कारखाण्याच्या ताब्यात आहे.
३) अदालतवाडा : अजिंक्यताऱ्याच्या पायथ्याशी बोगद्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर शाहूमहाराजांच्या कालावधीपासून अस्तित्वात असलेल्या वस्तूचा महाराज न्यायालयासारखा उपयोग करीत. हि इमारत ६७. मीटर लांब व ४८ मीटर रुंद आहे. १८७६ पर्यंत या इमारतीचा उपयोग दिवाणी न्यायालय
म्हणून केला जात असे. त्यानंतर मात्र नवीन राजवाड्याचा वापर न्यायालयासाठी होऊ लागला. सध्या अदालत वाडा सातारा राजकुलाचे शिवाजीराजे भोसले यांचे वसतिस्थान आहे.
४) बेगम मस्जिद: औरंजेबाची मुलगी बेगम झीनतउन्निसा हिने शाहूमहाराजांच्या कैदेत असताना चांगला सांभाळ करून त्यांचे धर्मांतरण होऊ दिले नव्हते. झीनतउन्निसा बेगम १७२१ साली वारली. तिच्या स्मरणार्थ शाहूमहाराजांनी अदालत वाड्याच्या जवळच एक मस्जिद बांधली. आज त्या मस्जिदीचे जोते आहे त्यावर नवीन मस्जिद उभारली आहे.
साताऱ्यात म्हणजेच शाहुनगरमध्ये अनेक वाडे बांधण्यात आले होते. फत्तेसिंह वाडा , मंत्र्यांचा वाडा, शिर्के यांचा वाडा, पंडितरावांचा वाडा, तसेच मंगळवार पेठेत शाहूमहाराजांच्या पत्नी सगुणाबाई यांचा वाडा होता. तो वाडा आजही धनिणीची बाग म्हणून प्रसिद्ध आहे.
छत्रपती थोरले शाहू महाराज यांनी नवीन वसवलेल्या पेठांची माहिती –
1) माची पेठ – अजिंक्यतारा किल्ल्याच्या उत्तरेस पूर्व पश्चिम अशी माची भागात ही पेठ वसविली गेली आहे . या पेठेतच रंगमहाल व अदालतवाडा ही निवासस्थाने स्वतः साठी बांधली .
2) मंगळवार पेठ – ही पेठ सातारा शहराच्या पश्चिमेस माची पेठे शेजारी येते . याच पेठेत श्रीपतराव पंत प्रतिनिधिनीं एक खूप मोठे व खोल तळे बांधले त्यास मंगळवार तळे म्हणतात इ स 1700 मध्ये सातारा किल्ल्यावरील मंगळाईचा बुरूज औरंगजेबाच्या बाजूने उडवून देणारे डफळे नावाचे सरदार होते . ते पुढे छत्रपती शाहू महाराजांचे मांडलीक झाले . त्यांनी आपला वाडा या पेठेत बांधला . तसेच छत्रपती शाहू महाराजांची राणी सगुणाबाई यांना मंगळवार तळ्याच्या उत्तरेस महाराजांनी वाडा बांधून दिला व तेथे मोठी बाग तयार करुन दिली . त्या बागेस धनीनीची बाग असे नाव पडले कारण सगुणाबाईंना धनीन या नावाने संबोधले जात असे .
3) मेट – छत्रपती शाहू महाराजांच्या काळाच्या पुर्वी पासुन अजिंक्यताराच्या तटाची व रात्रीच्या वेळी गस्त घालण्याची जबाबदारी महार जातीच्या लोकांच्या वर होती . तत्कालीन सातारा किल्ल्याच्या तटाच्या डोंगर उतारा वर रंगमहाल राजवाड्याच्या पुर्वेस त्यांची वस्ती केली . त्यास मेट असे नाव होते .
4) चिमणपुरा पेठ – छ शाहू महाराजांचे सरदार चिमणाजी दामोदर या खानदेशातील जहागिरदाराने आपला वाडा मंगळवार पेठेच्या पश्चिमेस बांधून ही पेठ वसविली . चिमणाजी दामोदर हे छत्रपती शाहू महाराजांचे राजाद्न्या म्हणजेच खाजगी चिटणीस व राजांच्या खाजगी उत्पन्नाचा हिशेबनीस होते . त्यांच्या नावावरून या पेठेस चिमणपुरा पेठ हे नाव दिले गेले .
5) व्यंकटपुरा पेठ – सन 1730 साली कोल्हापुरकर छत्रपती संभाजीराजे व छत्रपती शाहू महाराज यांचे दरम्यान वारणेची लढाई झाली . त्या लढाईत इचलकरंजी चे व्यंकटराव घोरपडे यांचा पाडाव झाला . ते शाहू महाराजांचे पेशवा बाळाजी विश्वनाथ यांचे जावाई होते . यामुळे महाराजांनी चिमणपुरा पेठ व मंगळवार पेठेच्या शेजारी त्यांना वाडा बांधून सातारा येथे स्थायिक केले . त्या भागास व्यंकटपुरा पेठ हे नाव पडले .
6) ढवळपुरा – मराठेशाहीत कापडाचा व्यापार फार महत्वाचा समजला जात असे . प्रत्येक सरदार कापड विणणार्या लोकांना आपल्या राहण्याच्या गावी राहण्यास जागा देत असत . छत्रपती शाहू महाराजांना शिकारीचा व मासेमारीचा छंद होता . ते गळाने मासे मारीत असत . मासेमारीसाठी लागणारे सुत त्या काळी बुर्हाणपूर येथून आणावे लागत असे . ही उणिव भरून काढण्यासाठी ढवळे नावाच्या शिंप्यास जागा देऊन महाराजांनी शिंपी लोकांची वस्ती चिमणपुर्यातच केली . त्या भागास ढवळपुरा नाव पडले .
7) रामाऊचा गोट – मंगळवार पेठ व चिमणपुरा पेठेच्या मधोमध नागपूरच्या भोसले घराण्यातील रामाऊ भोसले या नावाच्या कर्तबगार स्त्रीने आपला वाडा बांधून सैन्य बाळगले होते . छ शाहू व नागपूरचे भोसले यांचे संबंध निकटचे होते . त्यांनी छत्रपती शाहू महाराजांना लढाईचे वेळी मोठे सहकार्य केले होते . त्या मुळे त्या भागास रामाऊचा गोट असे नाव दिले .
8) यादोगोपाळ पेठ – वारणेच्या तहानंतर महाराणी ताराबाई सातारा येथे राहण्यास आल्या . शाहू महाराजांनी त्यांची राहण्याची व्यवस्था अजिंक्यतारा किल्ल्यावरील वाड्यात केली व त्यांच्या मदतीला यादोगोपाळ खटावकर यास नेमुन दिले . त्यांनी यादोगोपाळ पेठेची रचना केली व या पेठेत सचिवांचा वाडा व पिलखान्याची बांधणी करून दिली . त्या मुळे मंगळवार पेठ व सोमवार पेठेच्या या मधल्या भागास यादोगोपाळ पेठ असे नाव पडले .
9) सोमवार पेठ – शनिवार पेठ व यादोगोपाळ पेठेच्या मध्ये ही पेठ वसविली गेली . वाड्यांच्या बांधकामासाठी तेथील ओढ्याच्या काठावरून दगड काढण्यात आले . तेथे तळे निर्माण झाले . ते सतत वाहत असे . त्यास पुर्वी हमामपुरा तळे असे नाव होते . त्यासच फुटके तळे हे नाव पडले . या तळ्यातील पाणी सोमवार पेठेतील लोकांना वापरणे सोईचे होते . त्यामुळे त्याचे आसपास सामान्य लोकांनी वस्ती केली . त्या भागास सोमवार पेठ असे नाव दिले गेले .
10) शनिवार पेठ – ही पेठ वसवण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी स्वतः सोमवार पेठ व रविवार पेठेच्या मध्ये अनेक सामान्य लोकांना कौल लावून जागा दिल्या व राजधानीच्या शहराची वस्ती वाढावी म्हणून प्रयत्न केले . या पेठेस शनिवार पेठ असे नाव दिले गेले . डोंगर उतारावरून उत्तरेच्या बाजूने ही सर्वात मोठी पेठ वसविली गेली .
11) गुरूवार पेठ – ही पेठ अगदी सुरवातीसच माची पेठेच्या उत्तरेस डोंगर उतारावर शाहू महाराजांनी वसविली व कितीतरी लोकांना कौल लावून जागा दिल्या . या पेठेच्या सुरवातीस तख्ताचा वाडा बांधला होता . त्याच्या आसपास त्यांनी अनेक सरदार व अधिकार्यांना वाडे बांधून दिले . या पेठेस गुरूवार पेठ असे नाव दिले .
12) रविवार पेठ – गुरूवार पेठेच्या पूर्वेस सातारा शहराच्या सीमेवर ही पेठ वसविली गेली . या पेठेत महाराजांनी लोणार व कुंभार समाजातील लोकांना घरे बांधण्यासाठी जागा दिल्या . या पेठेच्या पुर्वेला सातार्याहून माहुली , धामनेर , खिंडवाडी या गावाकडे जाणारे रस्ते होते . छ. शाहू महाराजांनी या पेठेच्या माळावर लोकांना व घोड्यांना पाणी पिण्यासाठी दगडी रांजण पाण्याने भरून ठेवण्याची व्यवस्था केली . त्या मुळे या भागास पोवईचा माळ असे नाव पडले होते . त्यासच सध्या पोवई नाका हे नाव पडले आहे .
13) केसरकर पेठ – रविवार पेठ व गुरूवार पेठेच्या मधील भागात शाहू महाराजांचे एकनिष्ठ सेवक जोत्याजी केसरकर यांच्या नावाने ही पेठ वसविली . छ. शाहू महाराज औरंगजेबाच्या कैदेत असताना त्यांच्या खाण्यापिण्याची व शिक्षणाची व्यवस्था जोत्याजी केसरकर यांच्या कडे होती . महाराजांनी सातारा येथे छत्रपती पद धारण केल्यानंतर त्यांनी ज्योत्याजी केसरकर यांना बिनीच्या हत्तीवर त्यांच्या जरीपटक्याचा भगवा ध्वज घेऊन बसण्याचा मान दिला होता .
14) बुधवार पेठ – शनिवार पेठेच्या उत्तरेस ही पेठ वसविली होती . या पेठेतून लिंब गावास जाण्याचा रस्ता होता . या पेठेत शाहू महाराजांनी प्राणी संग्रहालय व अनेक ठिकाणाहून निरनिराळ्या प्रकारची झाडे आणून बाग तयार केली होती . त्याची व्यवस्था पाहणार्या मुसलमान जातीच्या व माळी लोकांची वस्ती या पेठेत करण्यात आली होती . या बागेस बुधवार पेठ असे नाव होते .
15) रघूनाथपुरा पेठ – सातारा शहराच्या सौंदर्यात भर पडावी म्हणून शाहू महाराजांनी बुधवार पेठ व करंजे येथे जाणार्या मधल्या जागेत आंब्याची बाग तयार केली होती . त्या बागांची व्यवस्था पाहण्यासाठी माळी समाजाची वस्ती केली . त्या पेठेस थोरल्या बाजीरावांचा मुलगा रघूनाथ यांच्या नावावरून त्यास रघूनाथपुरा असे नाव प्राप्त झाले .
16) राजसपुरा पेठ – छ. शाहू महाराजांची राजसबाई या नावाची मुलगी राणी सकवारबाईंना झाली होती . ती अल्पावधीत निधन पावली . तिच्या स्मरणार्थ ही पेठ वसविली .
17) बसप्पा पेठ – बसप्पा नावाचा लिंगायत इसम शाहू महाराजांच्या कोठी वरील अधिकारी होता . तो खूप प्रामाणिक व विश्वासू होता . त्याच्या स्वामी निष्ठेवर खूष होऊन शाहू महाराजांनी त्याला खूप पैसे बक्षिस दिले . त्या पैशातून त्याने शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाच्या मंदिराचा जिर्णोद्धार केला . त्याच्या स्मरणार्थ त्यांनी ही पेठ वसविली . व . . तिला बसप्पा पेठ नाव दिले .
18) शुक्रवार पेठ – ही पेठ मंगळवार पेठेच्या नजीक आहे . या पेठेत छत्रपतींचे कारभारी सेवक वगैरे लोक राहत असत . ही पेठ त्या वेळी सातारा शहराच्या उत्तर सिमेवर होती . या पेठेत फत्तेसिंह भोसले यांची जागा होती त्या प्रमाणे या पेठेच्या पाणी पुरवठा साठी खूप मोठी बांधीव विहीर बांधण्यात आली . त्या विहीरीस बाजीरावाची . विहीर म्हणतात .
19) गेंडा माळ – शुक्रवार पेठेच्या उत्तरेस शहरा बाहेर शाहू महाराजांच्या शिकारी साठी राखीव माळ होता . शाहू महाराजांनी या माळावर एक गेंडा पाळलेला होता . त्या मुळे त्या माळास गेंडा माळ असे नाव पडले . त्या माळावरच पुढे 1857 च्या बंडातील क्रांतीकारकांना वडाच्या झाडास फाशी देण्यात आली . त्यास फाशी चा वड असे नाव पडले . त्या नंतर सन 1972 मध्ये या माळावर LIC कॉलनीचे बांधकाम करून नागरी वस्तीस सुरवात झाली . 1975 मध्ये जिल्हा परिषद मधील लोकांची घरे बांधण्यात आली . त्या वेळी या भागास शाहुपुरी हे नाव देण्यात आले . 2002 साली या ममी भागाची स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन झाली व शाहुपुरी हे स्वतंत्र गाव म्हणून नकाशावर आले .
20) गोसावी पुरा – सातारा शहराची भरभराट व्हावी व त्या ठिकाणी आर्थिक उलाढाल केली जावी म्हणून परप्रांतातुन सावकारी करणार्या गोसावी जमातीच्या लोकांना शुक्रवारी पेठेच्या टोकास जागा देण्यात आली . त्या भागात कोटेश्वर मंदिर बांधण्यात आले होते . पुरी गोसावी व गिरी गोसावी अशा दोन्ही पंथाचे लोक येथे राहत होते . त्या भागास गोसावी पुरा हे नाव पडले .
21) संगम माहुली – सातारा शहरा पासुन 5 कि
मी अंतरावर कृष्णा व वेण्णा नद्यांचा संगम झाला आहे . या पवित्र ठिकाणी छ. शाहू महाराजांच्या हुकुमावरून 1719 मध्ये संगमाच्या पश्चिमेस वेण्णा नदीच्या दक्षिण तीरावर 40 ब्राह्मणांची वसाहत करण्यात आली . या वसाहतीस मौजे खेड पैकी अर्धा चावर जमीन इनाम दिली . पाटखळ गावी 5 बिघे जमीन इनाम दिली . या वसाहतीस संगम माहुली नाव दिले .
————————
डोंगर उतारवर वसलेल्या व दुर्धर भौगोलिक परिस्थिती लाभलेल्या सातारा शहराला नगररचनेचा एक अद्भुत नमुना म्हटले तर गैर ठरणार. सातारा शहर भल्या मोठ्या साम्राज्याची राजधानी असून देखिल शहरला कोणतीही तंटबंदी नाही. सर्वात अश्चर्य म्हणजे ११० वर्षे राजधानीचा दर्जा लाभलेल्या सातारा शहरावर कधीच आणि कोणत्याच शत्रूने आक्रमण करण्याचे धारिष्ट्य दाखवले नाही आणि याचे सर्व श्रेय जाते हिंदनृपती छत्रपती थोरल्या शाहूमहाराजांना.
संदर्भ -1) मराठ्यांचा इतिहास – अ. रा . कुलकर्णी , ग. ह. खरे
2) मराठी रियासत – गो. स. सरदेसाई
3) मराठ्यांचे दुसरे स्वातंत्र्य युध्द – डॉ जयसिंगराव पवार
#सरदार
#शाहुपर्व
#जागर_इतिहासाचा