सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी प्रसार माध्यमांना बिहारमधील मुलींच्या वसतीगृहातील बलात्कार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण निर्देश दिले असून बलात्कार पीडित लहान मुलांचे छायाचित्र पसार माध्यमांनी दाखवू नये, त्याचबरोबर चेहरा ब्लर केलेले किंवा मॉर्फ केलेले छायाचित्रदेखील वापरु नये, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वी बिहारमधील मुझफ्फरपूर येथील मुलींच्या वसतीगृहात लहान मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून बिहारमध्ये जवळपास ३० मुलींवर बलात्कार करण्यात आला असून या घटनेने संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान आज बिहार बंदची हाक देण्यात आली असून या प्रकरणाची स्वत:हून सर्वोच्च न्यायालयानेही दखल घेतली. बिहार सरकार, महिला व बालकल्याण मंत्रालयाला सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी नोटीस बजावली आहे. यासंदर्भात बिहार सरकारने तपास अहवाल सादर करावा, असेही न्यायालयाने सांगितले आहे.
तसेच वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांनाही सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत. न्यायालयाने बलात्कार पीडित लहान मुलांचे छायाचित्र (मॉर्फ केलेले आणि चेहरा ब्लर केलेले सुद्धा) वापरु नये, असे सांगितले. त्याचबरोबर त्यांची मुलाखाती देखील घेऊ नये, असेही स्पष्ट केले.