बदलापुरातील एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेनं संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. यामुळे संतप्त झालेल्या बदलापुरातील नागरिकांनी बदलापूर बंदची हाक दिली आहे. तसंच बदलापुरात रेल्वे रोको आंदोलनही करण्यात येत आहे. आता याप्रकरणी राज्यातील महिला नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
बदलापूर घटनाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, “एखादी घटना घडली तर नुसत्या बदल्या करुन प्रकरण सुटणार नाही. गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना याचं उत्तर द्यावं लागेल. बदलापूरमध्ये जी घटना घडली त्याचा मी जाहीर निषेध करते. अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्याला फास्टट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून फाशीची शिक्षा व्हायला हवी. सुसंस्कृत महाराष्ट्राच्या लेकीला न्याय देऊ शकत नसेल तर, सरकारनं राजीनामा दिला पाहिजे,” अशी संतप्त प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.
“राज्यात बलात्काराच्या घटना घडत आहेत, महिलांविरोधातले अत्याचार वाढले आहेत. लाडकी बहीण योजना राबवून महिलांना राज्य सरकार 1500 रुपये देत आहे. त्या योजनेचं स्वागत करते, पण महिलांची सुरक्षितता ही पण सरकारची जबाबदारी आहे,” असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.
बदलापूर प्रकरणी आरोपीला भर चौकात आणून फाशी दिली पाहिजे. मला एक महिला आणि आई म्हणून खूप दुःख होत आहे. – नवनीत राणा, माजी खासदार
नराधमाला फाशीच होणार. शाळेत चार वर्षीय दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराची घटना अत्यंत निंदनीय आहे. मी स्वतः एक आई असून या चिमुकल्यांच्या कुटुंबावर काय संकट आलं असेल, याची कल्पना करू शकते. – चित्रा वाघ, भाजपा महिला प्रदेशाध्यक्षा
पालकांनी आणि नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये. संबंधित गुन्हेगाराला फाशी लवकरात लवकर कशी देता येईल यासाठी प्रयत्न केला जाईल. बदलापूरमधील संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेणार असून त्याचा अहवाल लवकरात लवकर सरकारकडे सुपूर्द करणार. – नीलम गोऱ्हे, विधानपरिषद उपसभापती
बदलापूर येथे दोन अल्पवयीन शालेय विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना अत्यंत घृणास्पद आहे. सदर घटनेतील नराधमांना कठोरात कठोर शिक्षा करावी, अशी असे मी सरकारला विनंती करते. – मनीषा कायंदे, शिवसेना प्रवक्त्या