सकाळी १० वाजता आंदोलक प्रकल्पाच्या जमिनीवर जायला निघाले. तोपर्यंत खासदार विनायक राऊत बारसूच्या दिशेने निघाले होते. आंदोलनकांची मोठी गर्दी पाहून पोलिसांचा फौजफाटा वाढला. माती परिक्षणाला ठाम विरोधाची भूमिका पाहून दुपारी अडीजच्या सुमारास पोलिसांनी अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या. तसेच आंदोलकांची धरपकड केली.
‘एकच जिद्द-बारसू रिफायनरी रद्द’ अशा घोषणा देत ग्रामस्थ आणि आंदोलनकर्ते आक्रमक झाले आहेत. ज्या ठिकाणी सर्वे सुरू आहेत त्या ठिकाणाहून ग्रामस्थांना आता हटवण्यात आले आहे. पोलिसांकडून या आंदोलनकर्त्यांची धरपकड सुरू करण्यात आली होती. सरकार आमच्यावरती अन्याय करते आहे, असा आरोप करत घाला गोळया आम्हाला एकदाच्या आणि विषय संपून टाका… अशा संतप्त भावना पोलिसांच्या गाडीत बसून जाताना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केल्या.
राजापूर बारसू येथील रिफायनरीचे रण पेटले आहे. ग्रामस्थांनी जमाव केल्याने व प्रशासन ऐकण्याच्या मनस्थिती नसल्याने पोलिसांनी अश्रूधुराचा वापर केला. त्यामुळे आंदोलन करणाऱ्यांपैकी अनेकांना त्रास झाला. लाठीचार्जही करण्यात आल्याचा आरोप करत पोलिसांकडून मारहाण झाल्याचा दावा ग्रामस्थांनी केला. राजापूर शिवणे येथील अंकुश घाडी याची प्रकृती बिघडल्याने त्याला राजापूर सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आंदोलकांचा पिंजऱ्यातून एल्गार, जीव मारा पण मागे हटणार नाही!
बारसू परिसरात सड्यावरती आक्रमकपणे आंदोलन करणाऱ्या काही ग्रामस्थांची धरपकड सुरू करण्यात आली आहे. अनेकांना गाडीत बसवून पोलीस ठाण्यात डांबून ठेवण्यात आलं आहे. जिल्ह्यात प्रशासनाकडून मनाई आदेश लागू असतानाही आंदोलनकर्ते आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत. अक्षरश: भर उन्हात काही महिला ग्रामस्थ याठिकाणी बारसू सड्यावर ठाण मांडून आहेत. अनेकांना या उन्हाळ्याचा त्रासही आता होऊ लागला आहे.
गेले दोन दिवस काहीच शांत असलेलं येथील वातावरण आज पुन्हा गरम झालं. बारसूमधील माती परिक्षण करण्यास गेलेल्या टीमला आंदोलनकर्त्यांनी विरोध केला. त्यावेळी खासदार विनायक राऊत हे आपल्या पदाधिकाऱ्यांसह आंदोलनकर्त्यांना भेटायला गेले, मात्र पोलिसांना त्यांना रोखून ताब्यात घेतलं. जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केलेली विनंती खासदार राऊतांनी फेटाळून लावत आंदोलन करण्याचा प्रयत्न केल्याने राऊतांसह काही सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.